पुणे: केंद्र सरकारने मे महिन्यासाठी साखरेचा 23 लाख 50 हजार मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे. साखरेला राहणारी वाढती मागणी विचारात घेता घोषित कोटा अपुरा असल्यामुळे दर तेजीकडे झुकण्यास मदत झाली आहे. गतवर्षी मे 2024 मध्ये 27 लाख टन साखर कोटा खुला केला होता. याचा विचार करता यंदा सुमारे साडेतीन टनांनी साखर कोट्यात कपात करण्यात आल्यामुळे दर कडाडणार असल्याची माहिती घाऊक बाजारातून देण्यात आली.
देशात यंदा साखरेचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच साखर कोट्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असावा, अशी चर्चा घाऊक बाजारपेठेत सुरू आहे. घाऊक बाजारात सोमवारी (दि.28) एस 30 ग्रेडसाखरेचा प्रतिक्विंटलचा दर 4125 ते 4150 रुपये आहे. (Latest Pune News)
सध्याचे साखर दर क्विंटलला 25 ते 50 रुपयांनी वाढ होऊन दर स्थिरावले आहेत. एप्रिलमधील साखरेच्या शिल्लक कोट्यास केंद्राने मे महिन्यात विक्रीला मुदतवाढ दिलेली नाही. मात्र, राहिलेल्या दोन दिवसांत कारखान्यांवरील साखर निविदा उंचावण्यास पोषक स्थिती निर्माण झाली आहे. सध्या साखरेच्या निविदा क्विंटलला 3750 ते 3800 रुपयांपर्यंत जात आहेत. मे महिन्यातील निविदा सुरू होताच दर उंचावतील, अशी स्थिती आहे.
मे महिन्यात वाढता उन्हाळा, थंडपेय, शीतपेय उत्पादकांची राहणारी हमखास मागणी, लग्नसराई, यात्रा-जत्रा, आइस्क्रीम उत्पादकांकडून साखरेला मोठी मागणी राहते. साखरेच्या खपाचे दिवस सध्या सुरू असून, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मागणी आणखी वाढेल. त्यातच आगामी काळात साखरेचे दर तेजीत राहण्याच्या अंदाजामुळे साठवणूकदारांचाही शिरकाव साखर खरेदीत वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे दर तेजीत राहतील, असा अंदाज जाणकार व्यापार्यांकडून वर्तविण्यात येत आहे.