पुणे

गोळीबार प्रकरण : निवृत्त मेजरच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक

Laxman Dhenge

भोर : पुढारी वृत्तसेवा : पसुरे- कर्नवडी (ता. भोर) येथील शेतकर्‍यांना धमकाविण्यासाठी हवेत गोळीबार करून दहशत माजविणार्‍या निवृत्त मेजरच्या विरोधात शेतकरी संघटना तसेच स्थानिक शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पसुरेतील स्थानिक शेतकर्‍यांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण करून निवृत्त मेजर हितेशपाल सिंग याने विजेचे खांब उभे केले होते. याबाबत बुधवारी (दि. 15) बिर्‍हामणेवाडीतील अशोक गेणबा बिर्‍हामणे, प्रकाश तुकाराम शेलार, शंकर दिनकर बिर्‍हामणे, सोनबा कोंडिबा बिर्‍हामणे, चंद्रकांत कुरुंगावडे व कर्नवडीतील पवार हे शेतकरी जाब विचारण्यासाठी गेले होते. या वेळी शेतकर्‍यांना धमकाविण्यासाठी कर्नल सिंग यांनी हवेत दोन फैरी झाडल्या होत्या. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक शेतकर्‍यांनी या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहशत माजवणार्‍या फार्म हाऊस (कुंजवन) मालकावर व त्यांच्या सोबत असणार्‍या इतर दोन ते तीन साथीदारांवर कारवाई व्हावी, महसूल विभागाशी संपर्क करून ज्या बेकायदेशीर जागेवर ताबा केला आहे त्या सर्व जागांची चौकशी करावी, तसेच त्यांचे दोन वर्षाचे फोन रेकॉर्डिंग तपासून त्यांच्यावर योग्य कारवाई व्हावी. हे निवेदन भोर पोलिसांनादेखील देण्यात आले आहे.

दरम्यान, याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे युवा शेतकरी संघ व नागरिक शेतकरी संघाने इशारा दिला. या वेळी नागरिक शेतकरी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे, युवा शेतकरी संघाचे अध्यक्ष रोहिदास चोरघे, सरपंच प्रवीण धुमाळ, मानसिंग धुमाळ, विजय धुमाळ, उमेश देशमुख, विनोद गायकवाड, बाळासो चोरघे व ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांनाच दिला पोलिसांनी दम

आचारसंहिता असताना तुम्ही बेकायदेशीर जमाव केला असून, तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा दम या घटनेनंतर भोर पोलिसांनी पसुरे-कर्नवडी ग्रामस्थांना फोनवरून दिला.

हितेशपाल सिंगला 1 दिवसाची कोठडी

निवृत्त मेजर हितेशपाल सिंग याचेवर भोर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अशोक गेनबा बिर्‍हामणे (रा. पसुरे) यांनी भोर पोलिसांत फिर्याद दिली. भोर पोलिसांनी बुधवारी सिंग याला अटक केली असून, त्याला गुरुवारी (दि. 16) भोर न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT