फटाक्यांच्या आवाजाने डोळे-कानांना त्रास Pudhari
पुणे

Firecracker Injuries: फटाक्यांच्या आवाजाने डोळे-कानांना त्रास; भाजण्याच्या घटनांत वाढ, काय आहे कारण?

पुण्यात 25 हून अधिक नागरिक जखमी; डॉक्टरांचा फटाकेमुक्त दिवाळीचा सल्ला

पुढारी वृत्तसेवा

पुणे : दिवाळीत फटाक्यांमुळे शहरात डोळे आणि कानांना इजा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे उत्सवाच्या आनंदावर विरजण पडल्याचे पाहायला मिळत आहे. फटाके अंगावर उडून भाजल्याच्या घटनाही घडल्या आहेत. फटाक्यांमुळे इजा झालेले रुग्ण वाढल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. (Latest Pune News)

शहरातील विविध रुग्णालयांत गेल्या आठवडाभरात डोळे, कान आणि चेहऱ्याला भाजल्याचे रुग्ण वाढले आहेत. यावर्षी फटाक्यांशी संबंधित अपघातांचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत अधिक असून, बहुतांश रुग्ण हे 15 ते 30 वयोगटातील युवक-युवती आहेत. ससून रुग्णालय, औंध जिल्हा रुग्णालय आणि खासगी नेत्र रुग्णालयांत गेल्या काही दिवसांत फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा झालेल्या 25 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. नागरिकांनी फटाक्यांच्या तीव आवाजामुळे कान दुखणे, तात्पुरती बहिरेपणाची तक्रार घेऊन कान-नाक-घसा विभागात उपचार घेतले आहेत.

सिंहगड रस्ता परिसरातील एका घटनेत नेपाळमधील 20 वर्षीय विद्यार्थिनीच्या दोन्ही डोळ्यांना शोभेचा फटाका वाजवताना गंभीर इजा झाली होती. तिच्यावर उपचार करण्यात आले आहेत. मात्र, बेसावधपणे फटाका वाजवल्याने डोळ्याला इजा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दिवाळीत होणारे प्रदूषण लक्षात घेऊन तरुणाईने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यावर भर द्यायला हवा, असाही मतप्रवाह समोर येत आहे.

या कारणामुळे मोठ्या प्रमाणात अपघात

दिवाळीच्या आठवड्यात फटाक्यांमुळे भाजण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. डोळ्यांभोवती ठिणग्या किंवा ज्वाळांमुळे भाजण्याचा त्रास, हात, चेहरा आणि मानेवर भाजण्याच्या जखमा झाल्या. काही रुग्णांना कानाजवळ भाजणे किंवा फटाक्याचा तडाखा बसला, तर उर्वरित प्रकरणांत कपड्यांना आग लागणे किंवा केस जळण्याच्या घटना झाल्या. बहुतांश अपघात फटाके चेहऱ्याजवळून पेटवणे, अर्धवट विझलेले फटाके पुन्हा पेटवणे, खराब दर्जाचे किंवा ओले फटाके वापरणे आणि सुरक्षित अंतर न राखणे या कारणांमुळे घडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दिवाळीनंतर डोळ्यांच्या भाजण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक जण उपचारात विलंब करतात किंवा घरगुती उपाय करतात, त्यामुळे स्थिती अधिक गंभीर होते. फटाका लागल्यास त्वरित थंड पाण्याने चेहरा धुऊन नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
डॉ. अनिल दुधभाते, नेत्रतज्ज्ञ
फटाक्यांचा आवाज 140 डेसिबलपर्यंत पोहचतो, जो कानाच्या पडद्याला हानी पोहचवू शकतो. यंदा अनेक रुग्णांना कान दुखणे, गुंजारव किंवा तात्पुरती श्रवणशक्ती कमी होण्याच्या तक्रारी घेऊन येताना आम्ही पाहिले. विशेषतः मुलांनी आणि ज्येष्ठांनी फटाक्यांपासून योग्य अंतर राखणे आवश्यक आहे.
डॉ. मनीषा देशमुख, कान-नाक-घसातज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT