पुणे: फटाके उडविताना चायनीज गाडीकडे फटाके फेकू नको, या कारणावरून दोन गटात झालेल्या भांडणात जखमी झालेल्या एका तरुणाचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. जितेंद्र परमेश्वर ठोसर (वय 35, रा. रामटेकडी, हडपसर) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. (Latest Pune News)
रामटेकडी येथील पिवळा चौकातील निजा चायनीज सेंटरवर 21 ऑक्टोंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली होती. याबाबत प्राजक्ता अविनाश देडगे (वय 25, रा. मगरीनबाई चाळ, रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी खन्नासिंग अजितसिंग कल्याणी (वय 45, रा. साईमंदिर रामटेकडी) याला अटक केली आहे. त्याच्या साथीदारांवरही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा यश विश्वजित ठोसर (वय 30) हा निंजा चायनीज हातगाडी चालवितात. त्यांच्या हातगाड्यावर लक्ष्मी पूजा करण्यासाठी नणंद अनिता विश्वजित ठोसर, अश्विनी जितेंद्र ठोसर, भाऊ जितेंद्र परमेश्वर ठोसर, विश्वजित परमेश्वर ठोसर, भाचा वंश विश्वजित ठोसर हे जमले होते. त्यांच्या ओळखीचा लक्कीसिंग खन्नासिंग कल्याणी हा पिवळा चौक येथून पेटते फटाके हाताने त्यांच्या चायनीज दुकानाचे दिशेने फेकत होता. त्या वेळी पेटता फटाका त्याने त्यांच्या चायनीज गाडीवर फेकला. तेव्हा यश ठोसर याने असे का करतो, माझ्या हातगाडीवर तेलाची कढई, गॅस सिलेंडर आहे, तू आमच्या गाडीच्या दिशेने फटाके फेकू नको, असे बोलला.
त्याचा राग मनात धरून यश याला शिवीगाळ केली. त्याचवेळी खन्नासिंग कल्याणी व इतर जण बेकायदा जमाव जमवून लोखंडी पाईप व धारदार शस्त्रे हातात घेऊन त्यांनी वंश ठोसर याच्या दंडावर, पाठीवर तसेच तोंडावर आणि उजवे हातावर शस्त्राने वार केले. जितेंद्र परमेश्वर ठोसर याच्या नाकावर धारदार शस्त्राने मारून गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी व त्यांच्या सासू निलावती देडगे यांच्या डोक्यावर, पायावर मारून जखमी केले. अविनाश देडगे यांच्या पाठीवर लोखंडी पाईपने मारून गंभीर जखमी केले. उपचार सुरू असताना शुक्रवार पहाटे जितेंद्र ठोसर याचा मृत्यू झाल्याचे वानवडी पोलिसांनी सांगीतले.