पुणे: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी दृश्यकला शिक्षणामधील चार वर्षांचा पूर्ण-वेळ 'बॅचलर ऑफ फाईन आर्ट' रेखा व रंगकला शिल्पकला, वस्रकला, मातकाम, अंतर्गत गृहसजावट, धातुकला, उपयोजित कला प्रवेश नोंदणीची मुदतवाढ संपली असून, या मुदतवाढीनंतर १ हजार ३२४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाची पडताळणी व निश्चिती केली आहे. केंद्रिभूत प्रवेशाची पहिली फेरी दिनांक २४ जुलै ते २७ जुलै २०२६ दरम्यान होत आहे.
दृश्यकला शिक्षण अभ्यास क्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणी दिनांक ७ जुलै २०२६ पासून सुरू झाली होती. ती दिनांक १४ जुलै २०२६ पर्यंत होती. यानंतर याला दिनांक १९ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली होती व दिनांक २० जुलै २०२६ रोजी सायंकाळपर्यंत १३२४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाची पडताळणी करून या प्रवेश अर्जाची निश्चिती केली आहे. मागील वर्षी २०२५-२६ साली १४१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
दृश्यकला शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पहिल्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या प्रवर्गनिहाय जागा संकेतस्थळावर जाहीर केल्या असून, विद्यार्थ्यांना २७ जुलै २०२६ रात्री ११.५९ पर्यंत स्वतःच्या लॉगिनमधून कॅप फेरी-१ साठी पसंतिक्रम ऑनलाईन भरून तो निश्चित करणे आवश्यक आहे.
यानंतर २९ जुलै २०२६ सायंकाळी केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीतील तात्पुरत्या जागा वाटपाची यादी जाहीर करण्यात येईल. यानंतर ३० जुलै २०२६ ते ३ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ४ वाजेपर्यंत कॅप फेरी-१ च्या जागा वाटपानुसार उमेदवाराने स्वतःच्या लॉगइनद्वारे देऊ केलेली जागा स्वीकारणे आवश्यक आहे. सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत कॅप फेरी १ नंतर, जागावाटप केलेल्या संस्थेत हजर होणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे व शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
यानुसार प्रवेशाच्या एकूण दोन फेऱ्या होणार आहेत व यामध्ये जागा रिक्त असल्यास त्यासाठी 'मॉप-अप फेरी' राबविली जाईल व यानंतर संस्थास्तरीय जागांची माहिती जाहीर केली जाईल. संपूर्ण प्रवेशप्रक्रिया दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी संपणार आहे. प्रवेशाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी व अद्ययावत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाच्या www.mahacet.org संकेतस्थळाला भेट द्यावी, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.