अरवेर भिडेवाडा स्मारकाचा आराखडा निश्चित File Photo
पुणे

Bhide Wada News| अखेर भिडेवाडा स्मारकाचा आराखडा निश्चित

पुढारी वृत्तसेवा

ऐतिहासिक भिडेवाड्याच्या स्मारकाचा आराखडा अखेर निश्चित करण्यात आला असून, यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, स्मारकाचे भूमिपूजन विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी करण्यात येणार आहे.

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिवाजी रस्त्यावरील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी विविध घटकांकडून अनेक वर्षे केली जात होती.

वेळोवेळी राज्यातील शासनकर्त्यांनी याला मान्यताही दिली. मात्र, वाड्यातील भाडेकरूंनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने अनेकवर्षे भूसंपादन रखडले होते. दोन महिन्यांपुर्वी न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल देत भाडेकरूंना योग्य तो मोबदला देत भूसंपादन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वाड्याचा ताबा घेउन धोकादायक वाडा पाडला आहे.

त्यानंतर महापालिकेने वास्तूविशारदांकडून स्मारकाच्या आराखड्याचे प्रस्ताव मागविले आहेत. त्यानुसार सातहून अधिक प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्याचे सादरीकरण उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या समोर झाले.

यावेळी समता परिषदेचे अध्यक्ष व राज्यातील मंत्री छगन भुजबळ हे देखिल उपस्थित होते. याठिकाणी पुन्हा शाळा सुरू करावी, असा आग्रह भुजबळ यांनी धरला होता. त्यानुसार आराखडे तयार करण्यात आले आहेत. परंतू या ठिकाणी शाळा असावी, की ऐतिहासिक भिडेवाड्याची रिप्लिका उभारण्यात यावी, यावरून अंतिम निर्णय होउ शकत नव्हता.

अखेर आराखड्यावर शिक्कामोर्तब

अखेर आराखड्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पालिकेने पूर्वगणनपत्रक तयार केले आहे. त्यानंतर या स्मारकाच्या कामासाठी ७ कोटी २६ लाख ४८ हजार रुपयांची निविदा काढली आहे. निविदा भरण्याची अंतिम मुदत १६ जुलै आहे, अशी माहिती भवन रचना विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी दिली.

  • असे असेल स्मारक तळमजला अधिक तीन असे चार मजल्यांचे स्मारक असेल.

  • तळघरात दुचाकी पार्किंग

  • महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे

  • महात्मा दाम्पत्याचे सामाजिक कार्य विविध भाषांमध्ये चलचित्रांसह पाहण्याची व ऐकण्याची सुविधा.

  • ग्रंथालय आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण वर्ग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT