FDA Action Pudhari
पुणे

Pune FDA Action On Reliance Retail And Blinkit: पुण्यात रिलायन्स रिटेल आणि ब्लिंकिटला एफडीएचा दणका; दोन गोदामांचे परवाने निलंबित

मुदतबाह्य खाद्यपदार्थांच्या विल्हेवाटीचे पुरावे नाहीत; चाकणमध्ये अस्वच्छता, तर निघोजेतील गोदामात झुरळांचा प्रादुर्भाव

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मुदतबाह्य, खराब आणि नाकारलेले खाद्यपदार्थ नष्ट करण्याऐवजी त्यांची पुन्हा बाजारात विक्री होत असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागातील रिलायन्स रिटेल आणि ब्लिंकिट या ग्राहक विक्री केंद्रांना दणका दिला आहे. चाकण आणि निघोजे येथील दोन गोदामांचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत.

दि. १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी राबविलेल्या या मोहिमेसाठी सात पथके तयार करण्यात आली होती. त्यापैकी पाच पथकांनी ठाणे जिल्ह्यात, तर दोन पथकांनी पुणे जिल्ह्यात तपासणी केली. चाकण आणि निघोजे येथील गोदामांमध्ये मुदतबाह्य मालाची साठवणूक, स्वच्छतेचा अभाव आणि विल्हेवाटीच्या नोंदींमधील त्रुटी आढळल्या.

चाकण येथील रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या गोदामात उंदरांची विष्ठा, मुदतबाह्य व खराब उत्पादने एकत्र ठेवलेली आढळली. काही ठिकाणी झुरळांचा प्रादुर्भाव होता. कर्मचाऱ्यांकडून आवारात थुंकले जात असल्याचेही तपासणीत समोर आले.

विल्हेवाट कंत्राटदारासोबतचा करार सादर करण्यात आला; मात्र मालाची प्रत्यक्ष विल्हेवाट लावल्याचे पडताळता येणारे पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती एफडीएकडून पत्रकाद्वारे देण्यात आली.

झुरळांचा प्रादुर्भाव

निघोजे येथील ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्‍हेट लिमिटेडच्या गोदामात शीतगृहाचे तापमान पाच अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. शीतसाखळीच्या नोंदी उपलब्ध नव्हत्या. ५० किलो टाटा मीठ आणि ६० किलो सुजी थेट जमिनीवर ठेवले होते. गळती असलेली पाकिटे आणि झुरळांचा प्रादुर्भावही आढळला. सुमारे ६०० कर्मचाऱ्यांपैकी केवळ पाच जणांकडे अन्न सुरक्षा प्रशिक्षण पूर्ण केल्याची प्रमाणपत्रे होती. मुदतबाह्य मालाच्या विल्हेवाटीचे पुरावे सादर न केल्याने या गोदामाचा परवाना निलंबित करण्यात आल्याचे पत्रकात नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT