पुणे

पुणे : ‘जलसंपदा’च्या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

दिनेश चोरगे

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : येडगाव धरणासाठी परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा त्याग आहे. बहुतांशी शेतकऱ्यांच्या या धरणामध्ये जमिनी गेल्या आहेत. मात्र या बाधित शेतकऱ्यांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन झालेले नाही. त्यातही वेळेवर धरणातून शेतीसाठी पाणी मिळत नाही आणि वीजपंपाचे जोड तोडले जात आहेत. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या नारायणगाव कार्यालयाच्या कार्यकारी अभियंत्यांना खुर्चीवर बसू देणार नाही, असा इशारा दिला आहे. अशी माहिती धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बाबाजी नेहरकर यांनी दिली.

येडगाव धरणातून कुकडी नदीतून पूर्ण क्षमतेने पाणी शिरूर नगरपरिषदेच्या हद्दीत पिण्यासाठी नेणे शक्य व्हावे, म्हणून धरणालगतच्या सर्व शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचे वीजजोड दोन दिवसांपूर्वी नारायणगाव येथील जलसंपदा विभागाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून तोडले. परंतु स्थानिक शेतकरी आक्रमक झाल्याने आणि आमदार अतुल बेनके यांनी मध्यस्थी केल्यामुळे हे वीजजोड पुन्हा जोडून देण्यात आले. तथापि शिरूरला पाणी पूर्ण क्षमतेने नेण्यासाठी पुन्हा कृषीपंपांचे वीजजोड तोडावे लागेल, अशी माहिती उपविभागीय अभियंता आर. जे. हांडे यांनी शेतकऱ्यांना दिली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या नारायणगाव कार्यालय आवारात मंगळवारी (दि. ३०) ठिय्या आंदोलन केले.

सरपंच सीमा भोर, उपसरपंच अंकुश भोर, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सह्याद्री भिसे, माजी उपसरपंच हर्षल गावडे, माजी सरपंच देविदास भोर, कांदळीचे माजी उपसरपंच अनिल भोर, प्रमोद शिंदे, शिवाजी गावडे, सचिन भोर, मोहन हांडे, सुजाता जाधव, नीलम खरात, मधुकर शिंदे, राजू ढवळे, गिरीश बांगर आदी शेतकरी या वेळी उपस्थित होते.

यापुढे येडगाव परिसरातील एकाही शेतकऱ्याचे कृषीपंपाचे वीजजोड तोडणार नाहीत, याची हमी संबंधित अधिकारी देत नाही; तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी यावेळी घेतला. 'जय जवान जय किसान', 'तसेच कोण म्हणतो न्याय देत नाही, न्याय घेतल्याशिवाय आम्ही राहात नाही,' अशा घोषणाही अंदोलनस्थळी देण्यात आल्या.

शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर हे आंदोलनस्थळी आले. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. यापुढे कृषी पंपाचे वीजजोड तोडायचे झाल्यास आपल्याला पूर्वकल्पना देता येईल, एखादी आपत्कालीन वेळ आली तर तशी पूर्वकल्पना देण्यात येईल. आपण आंदोलन थांबवावे, अशी विनंती केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.

वीज जोडाला हात लावू देणार नाही

येडगाव धरणाच्या भूमिपूजनाच्या वेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पूजनाचे ताट उधळणारे येडगाव येथीलच शेतकरी होते. आमचा येडगाव धरणासाठी मोठा त्याग आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये भविष्यकाळात आम्ही आमच्या कृषी पंपाच्या वीजजोडाला हात लावू देणार नाही, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT