वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : यावर्षी पुरंदर तालुक्यात पर्जन्यमान अत्यल्प झाल्याने जमिनीतील पाणी पातळी खालावली असून, अनेक गावांत मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे. तरीदेखील प्रशासनाकडून कोणत्याच उपाययोजना होत नसल्यामुळे शेतकरीवर्गाकडून आता वेगवेगळ्या पद्धतीने शेती, जनावरांसाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. तालुक्यातील अनेक गावांतील विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. यामुळे विहिरीतील गाळ काढून पाणी पातळी वाढवण्याचे तसेच जास्त खोल बोअर घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अनेकांनी आडवे, उभे बोअर विहिरीत मारणे सुरू केले आहे. तालुक्यातील अनेक गावांत जेसीबी, पोकलेन तसेच क्रेनच्या साहाय्याने विहिरीतील गाळ काढला जात आहे.
50 ते 60 फूट खोल विहीर असल्यास त्या विहिराचा गाळ पोकलेनद्वारे काढला जात आहे, तर त्यापेक्षा जास्त खोल असलेल्या विहिरींचा गाळ क्रेन (यारी) द्वारे काढला जात आहे. पुरंदरमधील दुष्काळामुळे जमिनीची पाणी पातळी अत्यंत खालावली गेल्यामुळे आता गाळ काढून येईल ते पाणी वापरून जनावरे तसेच शेती जगवण्याचे मोठे आव्हान शेतकर्यांसमोर निर्माण झाले आहे. त्यामुळे आता मिळेल त्या परिस्थितीत शेतकरी पशुधन व शेती वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.तालुक्यात क्रेनचालक व मजुरांकडून प्रतिफूट 4 हजार 500 रुपयांनी शेतकरी गाळ काढून घेत आहेत. पोकलेनसाठी प्रतितास 4 हजार 500 रुपये शेतकर्यांना मोजावे लागत असल्याची माहिती शेतकरीवर्गाकडून देण्यात आली.
यावर्षी पावसाळ्यात नदी, ओढे-नाले, बंधारे भरून वाहिले नसल्याने तालुक्यातील अनेक भागांत पाणीपातळी खाली गेल्यामुळे विहिरी, बोअरवेल तसेच इतर पाणीसाठे आटले आहेत. काही ठिकाणी विहिरींची पाणीपातळी खोल गेल्याने काहीच उपयोग होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. तरीदेखील कसेही करून शेती व जनावरे जगविणे हाच एकमेव पर्याय शेतकर्यांसमोर राहिला आहे. पूर्वीच्या काळात गाळ काढण्याचे काम सर्व शेतकरी मिळून करीत; सद्यःस्थितीत हे काम बाहेरील कामगार घेऊन करीत असून, शेती आणि गुरे वाचविण्यासाठी बळीराजाचे शेवटचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा