नायगाव: रात्री-अपरात्री जीवाची पर्वा न करता राबून स्वतःच्या व इतरांच्या जगण्याचे बळ निर्माण करणाऱ्या जगाच्या पोशिंद्या शेतकऱ्याला रात्रीची पुरेशी झोप मिळावी यासाठी दिवसा शेतीसाठी वीजपुरवठ्याची शासनाने व्यवस्था करावी. सरकारने पुणे, मुंबईच्या नव्हे, तर शेतकऱ्यांच्या ‘नाइटलाइफ’ चा विचार करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
पुरंदर तालुका आजतागायत दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो, परंतु अलीकडच्या काळात थोड्याफार प्रमाणात उपलब्ध झालेल्या पाण्याच्या निर्मितीने व गावागावात तयार केलेल्या साठवण क्षमतेमुळे दुष्काळी ओळख पुसण्याचा मार्गावर आहे. शेतातील पिकांचे नियोजन करून योग्य प्रकारे उत्पन्न मिळावे यासाठी दिवसभर शेतात राबून तयार केलेल्या पिकांना घोटभर पाणी देण्यासाठी शेतकरी रात्री विश्रांती न घेता विजेच्या वेळेची वाट पाहत असतो. रात्री-अपरात्री जीवाची पर्वा न करता शेतात राबून उत्पन्न मिळवितो. मिळालेले उत्पन्न बाजारपेठेत विक्रीस नेले असता कवडी मोल भावाने विक्री करावी लागते.
सध्या रात्री-अपरात्री शेतीच्या विजपंपासाठी वीजपुरवठा होतो, तो दिवसा सुरळीत करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. रात्रीच्या वेळी शेतात पाणी धरत असताना अनेक शेतकऱ्यांना सर्पदंश झालेले आहेत. त्यातच आता संपूर्ण पुणे जिल्ह्यात बिबट्याचे देखील दर्शन होत आहे.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करून अशा संकट काळातून शेतकऱ्यांना कायमचे बाहेर काढणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांसमोर माल उत्पादित करण्यापासून विक्रीपर्यंत अनेक आर्थिक संकटे आहेत. मात्र सर्पदंश अन् बिबट्याच्या संकटाने शेतकरी धास्तावला आहे. शेती करताना प्रसंगी त्याला जीवही गमवावा लागत आहे.
रात्री वीज सुरू असल्याने शेतकरी रात्रभर शेतात पिकांना पाणी देण्यात मग्न असतो. अशा वेळी बिबट्यांचे हल्ले, सर्पदंश यासारख्या जीवघेण्या घटनांना बळी पडावे लागत आहे. म्हणून संकटकालीन परिस्थितीत जगाच्या पोशिंद्याला मदतीचा हात पुढे करून शेतीसाठी असलेला रात्रीचा वीजपुरवठा बंद करून फक्त दिवसा वीज मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.