डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्‍याचा मृत्यू; रुग्णाच्या नातेवाइकांचा आरोप  Pudhari
पुणे

Paud News: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्‍याचा मृत्यू; रुग्णाच्या नातेवाइकांचा आरोप

पौड रुग्णालयातून ससून रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

पौड: नांदगाव (ता. मुळशी) येथील शेतकरी शंकर तुकाराम पेरणेकर (वय 52) यांना सर्पदंश झाल्याने पौड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, पौड रुग्णालयातून ससून रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

पेरणेकर यांना शेतात काहीतरी चावले असे वाटले. त्यामुळे त्यांनी पौड ग्रामीण रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना तसे सांगितले. यावर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. उपचार चालू असताना संध्याकाळी पेरणेकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णवाहिका बोलावून त्यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले. (Latest Pune News)

या वेळी स्वतः डॉ. विद्या कांबळे पेरणेकरांसोबत रुग्णवाहिकेतून गेल्या होत्या. ससूनमध्ये गेल्यावर तेथील डॉक्टरांनी पेरणेकर यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र, पेरणेकर यांच्या नातेवाईकांनी पौड ग्रामीण रुग्णालयात चुकीचे उपचार झाल्याचा ठपका ठेवला आहे.

पेरणेकर अस्वस्थ होताच त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्याची गरज होती. त्यामुळे त्यांचे नातेवाईक जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्याची विनवणी करत होते. मात्र, पौड ग्रामीणच्या डॉक्टरांनी रुग्णाला जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्याऐवजी दूर पल्ल्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये नेण्याचा आग्रह धरला.

त्यात पौड ग्रामीणच्या रुग्णवाहिकेला चालकही उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णवाहिकेची तासभराहून अधिक काळ वाट पहावी लागली. शिवाय एवढा वेळ जाऊन सुद्धा पौड ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिवसभरात तयार झालेले वैद्यकीय अहवाल तसेच उपचारासंबंधींचे कागद ससून रुग्णालयात जाताना सोबत ठेवले नाहीत, ही अक्षम्य चूक केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

याबाबत पौड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना इसवे व डॉ. विद्या कांबळे यांनी सांगितले की, पेरणेकर यांनी त्यांना शेतात काहीतरी चावले असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले.

त्यानंतर त्यांची तपासणी केली असता वैद्यकीय अहवालात तसे काही आढळले नाही. त्यानंतरही त्यांच्यावर उपचार चालू ठेवले. मात्र, सायंकाळी त्यांना अत्यवस्थ वाटू लागले व आकडी येऊ लागली. त्यानंतर त्यांना आम्ही ससून रुग्णालयात घेऊन गेलो व तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.

राजकीय पदाधिकार्‍यांकडून कारवाईची मागणी

स्वराज्य पक्षाचे मुळशी तालुकाध्यक्ष राजू फाले यांच्यासह शिवसेनेच्या स्वाती ढमाले, ज्ञानेश्वर डफळ, प्रमोद बलकवडे, नामदेव टेमघरे, किसन फाले व नांदगाव ग्रामस्थ यांनी पौडच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना याबाबत जाब विचारत कारवाईची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT