मंचर/महाळुंगे पडवळ: आंबेगाव तालुक्यातील लौकी, चांडोली, खडकी, थोरांदळे, मांजरवाडी, जाधववाडी, जवळे, भराडी, नागपूर व इतर गावांसह जुन्नर तालुक्यातील काही गावांना डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यातून घोड कालव्याला पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
शनिवारी (दि. 3) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जुन्नर तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे यांच्यासह शेतकर्यांनी कळंब गावच्या हद्दीत असलेल्या डिंभे डाव्या कालव्यात उड्या मारत व घोड शाखा कालव्यातील पाण्यात बसून आंदोलन केले. (Latest Pune News)
कडक उन्हाळा असल्याने पिके जळू लागली आहेत. अनेक शेतकर्यांना पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. डिंभे डाव्या कालव्यातून घोड शाखेला गेल्या काही दिवसांपासून पाणी सोडले जात नसल्याने पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून वारंवार मागणी करूनही धरणाच्या डाव्या कालव्यातून घोड शाखेला पाणी सोडले जात नसल्याचा निषेध म्हणून शेतकर्यांनी कळंब येथील घोड शाखेत बसून आणि डाव्या कालव्यात उड्या मारून आंदोलन केले.
घोड शाखा कालव्यात पाणी सोडावे अन्यथा लव्याचे कुलूप तोडून पाणी सोडू, असा इशारा शेतकर्यांनी दिला आहे. या वेळी शेतकरी संतोष मोरे, जयसिंग थोरात, गणेश यादव, वामन पवार, शंकर टेमगिरे, नामदेव विश्वासराव, दत्ता विश्वासराव, रामचंद्र म्हस्के, अण्णा मोरे आदी उपस्थित होते.
अहिल्यानगर या ठिकाणी सोमवारी (दि. 5) जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची उन्हाळी हंगामाची बैठक होणार आहे. या बैठकीत होणार्या नियोजनानुसार मंगळवारी (दि. 6) घोड शाखा कालव्यास पाणी सोडण्यात येणार आहे.- प्रशांत कडूसकर, कुकडी पाटबंधारे क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता.