Diwali Farmer Financial Aid Pudhari
पुणे

Farmer Assistance 5000 Rupees: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा; पण पोस्टात पैसेच नाहीत! दिवाळीच्या तोंडावर लोणीतील शेतकऱ्यांची गैरसोय

शासकीय मदतीची रक्कम काढण्यासाठी पोस्ट कार्यालयात गेलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले; शुक्रवारपासून पैसे मिळणार असल्याचे पोस्टमास्तरांचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

लोणी-धामणी: शासनाने जाहीर केलेली ५ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, खात्यात पैसे जमा झाल्याचा आनंद घेण्याआधीच आंबेगाव तालुक्यातील लोणी येथील पोस्ट कार्यालयात रोख रक्कम उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर शासनाकडून खात्यात ५ हजार रुपये जमा झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. अनेक शेतकरी खात्यातील रक्कम काढण्यासाठी लोणी पोस्ट कार्यालयात पोहोचले. मात्र, पोस्ट कार्यालयात रोख रक्कम उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

एकीकडे शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा केली जात आहे, तर दुसरीकडे ती रक्कम काढण्यासाठी पोस्ट कार्यालयातच पैसे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दिवाळीच्या सणासाठी खर्चाची गरज असतानाच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. पोस्ट कार्यालयात नियमितपणे पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करून द्यावी आणि खात्यात जमा झालेली मदत शेतकऱ्यांना तातडीने मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

आजपासून पैसे मिळणार

यासंदर्भात लोणी येथील पोस्टमास्तर लोकेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, 'मी खेड येथील पोस्ट कार्यालयात पैसे आणण्यासाठी आलो आहे. मात्र, खेड पोस्ट कार्यालयातही रोख रक्कम उपलब्ध नाही. त्यामुळे खातेदारांना उद्या शुक्रवार (दि. ६) रोजी पैसे मिळतील,' असे लोणीचे पोस्टमास्तर लोकेश चव्हाण यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT