पुणेः डोळ्यासमोर वास्तव्यास असलेल्या बांगलादेशींचा सुगावा लागत नसलेल्या, फरासखाना पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील फौजदाराचे मात्र सोनेरी गुन्ह्यांच्या तपासावर मोठे लक्ष आहे. सराफ बाजार पेठेत आणि बंगाली कारागिरांच्या अनुषंगाने दाखल होणाऱ्या बहुतांश तक्रार अर्ज आणि गुन्ह्यांचा तपास या फौजदारांकडे सोपविले जात असल्याची माहिती आहे. दरम्यान, हे फौजदार प्रभारी अधिकाऱ्यांच्या एवढे मर्जितील आहेत की, त्यांच्याशिवाय यांचे एकही पान हलत नसल्याची पोलिस वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे त्यांना सोनेरी फौजदार म्हटले तर वावगे ठरणार नाही.
बांगलादेशी तरुणीच्या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या महिला पोलिस हवालदार देखील याच फौजदारांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकात कार्यरत होत्या. या फौजदारांना बांग्लादेशी तरुणी प्रकरणाची माहिती नसावी हे शक्य नाही. त्यामुळे तपास पथकाच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. शहरात अवैध पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींवर कडक करवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले असताना देखील फरासखाना पोलिस ठाण्यातील या महिला पोलिस हवालदाराने थेट त्या तरुणीसोबतच तोडपाणी करून तिला चक्क सोडून दिले. यापूर्वीदेखील फरासखाना पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुन्हे शाखा, विशेष शाखेच्या पथकांनी बांगलादेशींच्या विरुद्ध कारवाई केली आहे. एकाचवेळी पेठेतून वीस पेक्षा अधिक बांगलादेशींना त्यांनी पकडले आहे. त्यामुळे फरासखाना पोलिसांचे सर्व्हेलंन्स आणि गुन्हे शोध पथक नेमके काय करते हा मोठा सवाल आहे.
खरे तर हद्दीतील गुन्हेगारावर लक्ष ठेवणे, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, गुन्हे घडू नयेत म्हणून खबरदारी घेणे, त्याच बरोबर घडलेल्या गुन्ह्यांचा छडा लावणे ही प्रामुख्याने तपास पथकाची जबाबदारी आहे. मात्र फरासखाना पोलिस ठाण्यातील तपास पथकाच्या फौजदाराचे लक्ष केवळ सोनेरी गुन्ह्यावरच असल्याची चर्चा आहे.
फरासखाना पोलिस आणि बुधवार पेठेतील अवैध धंद्याचे कलंकीत वास्तव नवे नाही. बुधवार पेठेत वास्तव्य असणाऱ्या बांग्लादेशी तरुणीला एका प्रकारे अभय देण्याचा हा काही पहिलाच प्रकार आहे असे देखील नाही. यापूर्वी बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या एका पोलिस हवालदाराला थेट खात्यातून तत्कालीन गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी मार्च 2020 मध्ये बडतर्फ केले होते.
या पोलिस हवालदारासुद्धा इतिहास तसाच आहे. मिळून आलेल्या बांग्लादेशींवर कारवाई करण्याऐवजी या पोलिस हवालदाराने आरोपींना मदत केली होती. त्यावेळी एका २३ वर्षांच्या बांग्लादेशी तरुणीला वेश्या व्यवसायात लावून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. या प्रकरणात कुंटनखाना मालकीन आणि घरमालक अशा दोघांना पोलिसांनी अटक केली होती. कुंटनखाना मालकिनीचा मोबाईल तपासला तेव्हा 'या' पोलिस हवालदार कुंटनखाना मालकिनीच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे, ज्या सदनिकेत हा देहविक्रीचा व्यवसाय चालत होता ती सदनिका कुंटनखाना मालकीन आणि अन्य एकाच्या नावार होती. परंतु प्रत्यक्षात या पोलिस हवालदाराच्या पैशाने ती सदनिका खरेदी करण्यात आली होती.
खरेदीच्या दस्तऐवजावर साक्षीदार पोलिस याच हवालदाराची स्वाक्षरी होती. अनेकदा इतर शाखेच्या पथकांनी कारवाईची मोहीम आखली तरी याची माहिती अगोदरच कुंटनखाना चालविणाऱ्यांपर्यंत पोहचत असे. त्यामुळे कारवाईला यश येत नव्हते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. चौकशीत या पोलिस हवालदाराचाच्या गैरकृत्याचे बिंग फुटले. त्यानंतर त्याला चौकशीअंती पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले होते. तसेच फरासखाना पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिसाचा गळा चिरून खून झाला होता. त्यामुळे पोलिस अन् बुधवार पेठेचं कलंकीत वास्तव नवे नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
औरंगाबाद येथील एका व्यक्तीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून 25 हजार रुपये उकळणाऱ्या दोघा पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे दोघे पोलिस कर्मचारी त्यावेळी फरासखाना पोलिस ठाण्यातच नेमणूकीला होते. 2017 मध्ये ही घटना घडली होती. औरंगाबाद येथील एका व्यक्तीला बुधवार पेठेतील रेडलाईट एरियात आल्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल अशी धमकी देऊन त्याच्याकडून पैसे उकळे होते. एटीएमधून 15 हजार आणि दहा हजार रुपये रोकड असे 25 हजार रुपये या दोघा पोलिसांनी घेतले होते. दरम्यान हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तत्कालीन अपर पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिस खात्यातून बडतर्फ केले होते.