

मुंबई : भारत टॅक्सीसारखी महत्त्वाकांक्षी सहकारी योजना सुरू होण्याआधीच वादात सापडली आहे. या योजनेच्या संचालक मंडळासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. यात मतदार नोंदणी व मतदान प्रक्रियेपासून चालकांना वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप भारतीय गिग कामगार मंचने केला आहे.
चालकांचे म्हणावे तसे प्रतिनिधित्व या निवडणुकीत दिसून आले नाही. एकप्रकारे सहकाराच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासला, असा आरोप मंचचे अध्यक्ष डॉ.केशव क्षीरसागर यांनी केला आहे. या निवडणुकीत देशभरातून केवळ 368 मतदारांनी मतदान केले. त्यापैकी फक्त 145 चालक मतदार होते व त्यातून फक्त 2 उमेदवार निवडून संचालक मंडळावर निवडून गेले आहेत. कोट्यवधी कॅब व रिक्षाचालकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या सहकारी संस्थेसाठी हा सहभाग अत्यंत नगण्य आहे. चालकांना मतदार नोंदणी व मतदान प्रक्रियेपर्यंत पोहोचू दिले नसल्याचे क्षीरसागर यांचे म्हणणे आहे.
नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात एनसीडीसी कडून ही संपूर्ण प्रक्रिया गोपनीय ठेवण्यात आली. त्यामुळे देशभरातील लाखो चालक नोंदणी व मतदान प्रक्रियेपासून वंचित राहिले. देशातील सुमारे 4 कोटी चालकांचे भवितव्य या योजनेशी जोडलेले असताना अशा प्रकारची अपारदर्शक व मर्यादित सहभागाची निवडणूक सहकाराच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणारी असल्याचे गिग कामगार मंचचे म्हणणेे आहे.