Fake Police Officer Arrested Pudhari
पुणे

Fake Police Officer Arrested: तोतया पोलिसाचा पर्दाफाश! महिलांना फसवणाऱ्या सराईत ठगाला भिगवण पोलिसांनी पकडलं

फेसबुकवर ओळख करून सोनं-रोख रक्कम लुटणाऱ्या आरोपीकडून ३ लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी गुन्हे उघड

पुढारी वृत्तसेवा

भिगवण: वेगवेगळी नावे धारण करून तसेच पोलिस अधिकारी असल्याचे भासवून सोशल मीडिया वरून महिलांना रिक्वेस्ट पाठवून त्यांची फसवणूक करणाऱ्या सर्राइत ठगास भिगवण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गणेश शिवाजी कारंडे (वय ४३, रा. श्रीपूर, ता. माळशिरस, सोलापूर) असे या तोतया पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून, त्याच्यावर यापूर्वी अकलूज, मंगळवेढा, पंढरपूर, लोणंद पोलिस ठाण्यात देखील गुन्हे दाखल आहेत. (Latest Pune News)

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर २०२५ मध्ये कारंडे याने भिगवण येथील एका महिलेशी फेसबुकवरून ओळख निर्माण केली. त्यानंतर त्याने संबधित पीडित महिलेला कर्ज काढून देण्याच्या आमिषाने मदनवाडी भागातील एका लॉजवर बोलावून घेतले. तिथे त्याने महिलेच्या अंगावरील सोन्याचे चार ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, पाच ग्रॅमचे टॉप्स, रोख सहा हजार रुपये काढून ते पर्समध्ये ठेवायला सांगितले, त्यानंतर कर्जावरील फॉर्मवर अंगावरील तीळ व खुणा दाखविण्यासाठी कपडे काढायला लावले व त्यानंतर इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले तसेच महिलेच्या नकळत फिर्यादीची पर्समधील ७३ हजारांचा ऐवज चोरून नेला. यावरून या महिलेने भिगवण पोलिसात रीतसर फिर्याद दाखल केली होती.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी तपासकामी पथक तयार केले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित संशयित आरोपी हा अकलूज, वेळापूर भागात फिरत असल्याचे समजताच पोलिस अंमलदार महेश उगले, संतोष मखरे यांना त्याच्या शोधासाठी रवाना करण्यात आले या वेळी आरोपीचा शोध घेतला असता, अकलूज पोलिस स्टेशनच्या हद्दीत संबंधित कारंडे हा त्यांना मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरलेला ऐवज व चोरीसाठी वापरलेले साधन असा एकूण ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याकडे अधिक चौकशी करता आपले नाव गुप्त ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या मोबाईलच्या फेसबुक व इन्स्टाग्रामवर संग्राम पाटील, पृथ्वीराज पाटील या नावाने अकाउंट असल्याचे पुढे आले आहे.

ग्रामिण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, विभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद महांगडे, पोलिस अंमलदार सचिन पवार, महेश उगले, संतोष मखरे, प्रमोद गलांडे, गणेश पालसांडे, वैष्णवी राऊत या पथकाने ही कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT