Fake PMPML Mobile App Pudhari
पुणे

Fake PMPML Mobile App: बनावट पीएमपी ॲपद्वारे आर्थिक फसवणूक; तरुणावर गुन्हा

२४ वर्षीय कौस्तुभ मांजरेकरने बनावट मोबाईल ॲप तयार करून दैनंदिन पास वापरून पीएमपीची आर्थिक फसवणूक केली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पीएमपीच्या ॲप्लिकेशन सारखेच दिसणारे बनावट मोबाईल ॲप तयार करून त्यात खोटा दैनंदिन पास तयार करून पीएमपीची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी कौस्तुभ शैलेश मांजरेकर (वय 24, रा. प्रीतम हाईट्‌‍स, बालाजीनगर) या तरुणावर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पीएमपीएमएलतर्फे मिठ्ठू साहेबराव बडे (वय 45, रा. शेवाळेवाडी फाटा, मांजरी) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कौस्तुभ मांजरेकर हा नोकरी करतो. तो भारती विद्यापीठ बीआरटी बसस्टॉप येथून पीएमपी बसमधून प्रवास करीत होता. त्या वेळी त्याने वाहक मिठ्ठू बडे यांना आपल्या मोबाईलवरील दैनंदिन पास दाखविला.

तो पास पाहून त्यांना शंका आली. त्यांनी त्याची खात्री करण्यासाठी पीएमपी कार्यालयाशी संपर्क साधून त्याची खात्री करून घेतली. त्यात तो पास बनावट असल्याचे आढळून आले. कौस्तुभ मांजरेकर याने स्वत:च्या व इतरांच्या आर्थिक फायद्याकरिता पीएमपीच्या मूळ ॲप्लिकेशनसारखेच दिसणारे बनावट मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले. त्यात 70 रुपयांचा खोटा दैनंदिन पास तयार करून त्याचा वापर करून तो अधिकृत पासधारक असल्याचे भासविले. या पासद्वारे तो पुणे शहरात प्रवास करून पीएमपीची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT