पुणे; पुढारी वृत्तसेवा : बनावट शस्त्र परवाना बाळगून सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्या आठ जणांना वानवडी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून जम्मू-कश्मीर येथून बनावट शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, 12 बोअरची बंदूक, 56 काडतुसे, तीन बनावट शस्त्र परवाने, असा सहा लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संतोष जैनाथ शुक्ला (वय 50 रा. भागिरथीनगर, साडेसतरा नळी, हडपसर; मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश), रामप्रसाद बुध्दा पासवान (वय 35, रा. भिंगारवाडी, ता. पनवेल, जि. रायगड; मूळ रा. फतेहपूर, उत्तर प्रदेश), राजेश बबलू पासवान (वय 35 रा. फतेहपूर, अशोकनगर, उत्तर प्रदेश), दिनेश जगदीश पासवान (वय 54, रा. गोपीपूर, उत्तर प्रदेश), इम—ान मोहमद जिमी खान (वय 30, रा. राजोरी, जम्मू-काश्मीर), मोहम्मद बिलाल मोहम्मद निसारम्वय (वय 30 रा. मंजापूर, जम्मू-काश्मीर), साहिलकुमार चमनलाल शर्मा (वय 25, रा. राजोरी, जम्मू- काश्मीर), गीतम देशराय शर्मा (वय 23, रा. राजोरी, जम्मू-काश्मीर) अशी अटक करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांची
नावे आहेत.
हडपसर भागातील रामटेकडी परिसरात जुलै महिन्यात संतोष शुक्ला याला गस्त घालणार्या वानवडी पोलिसांच्या पथकाने पकडले होते. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा साथीदारांकडे बंदूक असल्याची माहिती त्याने दिली. साथीदारांकडे शस्त्र परवाना आहे, असेही त्याने पोलिसांना सांगितले होते. तळेगाव दाभाडे परिसरातील टोल नाक्यावर काम करीत असणार्या सुरक्षारक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे असलेल्या शस्त्र परवान्याबाबत चौकशी करण्यात आली तेव्हा शस्त्र परवान्यावर जम्मू-काश्मीरमधील जिल्हा न्यायदंडाधिकार्यांची बनावट स्वाक्षरी असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी आरोपींच्या घराची तपासणी केली. त्यांच्याकडून 12 बोअरची बंदूक, 56 काडतुसे, तीन बनावट शस्त्र परवाने जप्त करण्यात आले. वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.
हेही वाचा