येरवडा: सरकारी बँकेचे खोटे शिक्के वापरून बनावट मुदत ठेव पावत्या (एफडीआर) सादर करून महापालिका आणि बँकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारावर अखेर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सलीम गाजीबक्ष बांगी (रा. लक्ष्मीनगर, येरवडा, सध्या रा. लोहगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे.
त्याच्यावर सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करणे, खोटे शिक्के वापरून बनावट मुदत ठेव पावत्या तयार करणे आणि पालिका आणि बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. कनिष्ठ अभियंता माधुरी ठोंबरे यांनी फिर्याद दिली आहे.
ठेकेदाराने कामे मिळविण्यासाठी खोटे मुदत ठेव पावत्या (एफ डी आर) देण्यात आले होते. पावत्या खोट्या असल्याचे निदर्शनास आली तेव्हा शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, शाखा प्रमुख शशी साटोटे यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली. यावर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असा प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयाने अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवला होता.
त्यावर चौकशी झाल्यावर ठेकेदाराने बनावट मुदत ठेव पावत्या देऊन पालिका प्रशासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महापालिका अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दोषी ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकून पाच कामांची बयाणा रक्कम जप्त करणे आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावे, असे आदेश दिले होते. येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला होता.
अखेर आठ दिवसांनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर बनावट मुदत ठेव पावत्या सादर करणाऱ्या ठेकेदारावर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अश्या प्रकारे आजून किती ठेकेदारांनी फसवणूक केली आहे. आणि त्यांना कोणते अधिकारी पाठीशी घालत आहे. याची पालिका प्रशासनाने चौकशी करावी आणि दोषी अधिकारी आणि ठेकेदारांनवर कारवायी करण्यात यावी असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कडून संगण्यात येत आहे.
खोटे शिक्के वापरून बनावट मुदत ठेव पावत्या सादर करणाऱ्या आरोपीबर कागदपत्रांमध्ये परस्पर फेरफार करून आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ठेकेदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ठेकेदार अटक झाल्यावर खोटे शिक्के आणि बनावट एफडीआर कोठे तयार केली, यामध्ये कोणाचा हात आहे, तसेच आणखी किती लोकांना बनावट कागदपत्रे तयार करून दिली, हे तपासात पुढे येऊ शकेल.अंजुम बागवान वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन