पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यभरातून आळंदी व देहू येथे उपस्थित राहणार्या असंख्य भाविक, नागरिकांच्या सोयीसाठी पीएमपीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. या सेवेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दिनांक 16 ते 20 जून 2025 पर्यंत आळंदी करिता स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड, पिंपरीरोड या ठिकाणावरून सद्या संचलनात असणार्या बस व जादा बस अशा प्रतिदिनी एकुण 146 बस धावणार आहेत. तसेच, श्री क्षेत्र आळंदी करिता दिनांक 19 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. (Latest Pune News)
याशिवाय दिनांक 16 ते 20 जून 2025 पर्यंत देहूकरिता पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी, या ठिकाणावरून नियमितपणे संचलनात असणार्या बस व जादा बसेस अशा एकूण 37 बस धावणार आहेत. याशिवाय देहू ते आळंदी अशा 23 बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दिनांक 20 जून 2025 रोजी आळंदी येथूनपालखी प्रस्थान होत असल्यामुळे पहाटे 3 वाजल्यापासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, म.न.पा. या ठिकाणावरून आळंदीला जाण्याकरिता जादा 16 बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या व्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणार्या बस सकाळी 05:30 वाजल्यापासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बस स्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील 113 बस आळंदीसाठी भोसरी व विश्रांतवाडीपर्यंत भाविकांच्या सेवेसाठी संचलनात राहणार आहेत. तसेच, आणखी गरज भासल्यास देखील जादा गाड्या सोडण्याचे पीएमपी प्रशासनाचे नियोजन असणार आहे.