

पुणे: ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’च्या वार्षिक सभेसाठी येताच आजारी पडल्याचे नाटक करीत अध्यक्ष दामोदर साहू यांनी दोन दिवसांतच आठ दिवसांचे सत्र गुंडाळले. दरम्यान, गोखले संस्थेच्या वतीने अध्यक्ष दामोदर साहू यांना पदच्युत सचिव मिलिंद देशमुखसोबत सहआरोपी करा, अशी मागणी होताच त्यांनी ओडिशा राज्यातील कटक शहरात विमानाने अक्षरशः पलायन केले.
एप्रिल महिन्यात मिलिंद देशमुख यांना अटक होताच विश्वस्त मंडळ पुणे मुक्कामी होते. मात्र, देशमुख तेव्हा तुरुंगात होते. त्यांच्यावर गोखले संस्थेविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार होऊन अटक होताच अध्यक्ष साहू यांना प्रचंड दबावापोटी देशमुख यांंची सचिवपदावरून हकालपट्टी करावी लागली. मात्र, जूनचे सत्र 6 ते 14 यादरम्यान ठरलेले असतानाच अध्यक्ष साहू यांनी आजारी असल्याचे नाटक करीत तीन दिवस वेळकाढूपणा केला. (Latest Pune News)
दरम्यान, मिलिंद देशमुख यांनी एका माजी आमदाराच्या मदतीने या बैठकीत प्रचंड गोंधळ घातला. याकडे अध्यक्षांनी काणाडोळा केला. तेवढ्यात गोखले संस्थेच्या वतीने उपकुलसचिव विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत अध्यक्ष दामोदर साहू यांना मिलिंद देशमुखांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपात सहआरोपी करा, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे साहू यांचे धाबे दणाणले आणि ते ते विमानाने ओडिशात पळाले, अशी चर्चा संस्थेच्या आवारात रंगली आहे.
सत्र सोडून अध्यक्ष का पळाले..?
गोखले इन्स्टिट्यूटचे उपकुलसचिव विशाल गायकवाड यांनी देशमुख यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात अध्यक्ष दामोदर साहू यांना देखील सहआरोपी करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे दामोदर साहू यांचा मुलगा सुधांशू शेखर साहू यांनी सदस्य होण्यापूर्वींच वडिलांसह ओडिशा राज्यातील आपल्या कटक या शहरात धूम ठोकली.
त्यामुळे सत्रात कोणत्याही ठरावावर निर्णय झाले नाहीत. परंतु, प्रवासभत्ता मिळावा म्हणून सर्वच विश्वस्तांना भांडावे लागले. कारण, अध्यक्ष त्या धनादेशावर स्वाक्षरी न करताच पळून गेले. त्यामुळे विश्वस्तांमध्ये प्रचंड नाराजी पसरली.
धर्मादाय न्यायालयात जोरदार युक्तिवाद...
दरम्यान, प्रवीणकुमार राऊत यांनी बदल अर्जावर घेतलेल्या आक्षेपावर धर्मादाय न्यायालयात दि. 13 जून रोजी सुनावणी झाली. या वेळी अध्यक्ष वगळता सर्वच विश्वस्त न्यायालयात हजर होते. राऊत यांच्या वतीने अॅड. राजेश ठाकूर यांनी जबरदस्त युक्तिवाद केला. या प्रकरणावर प्रदीर्घ सुनावणी होऊन येत्या गुरुवारी (16 जून) पुढील सुनावणी होणार आहे.
लाडक्या बहिणीने नेमलेल्या वकिलांकडून वकीलनामे काढले
संस्थेची कसून चौकशी करण्यासाठी धर्मादाय न्यायालयाने स्वयंचौकशीचे आदेश याआधी दिले होते. त्यानुसार 13 जूून रोजी झालेल्या सुनावणीत संस्थेच्या विश्वस्तांना 16 जून रोजी आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले. दरम्यान, मिलिंद देशमुख यांची बहीण अॅड. रश्मी सावंत यांनी नेमलेल्या वकिलांकडून उपाध्यक्ष आत्मानंद मिश्रा यांनी वकीलनामे काढून घेतले. त्यापाठोपाठ इतर विश्वस्तांनीसुद्धा वकीलनामे रद्द करून घेतले. ही महत्त्वा च घटना 13 जून रोजी घडली.