

पुणे: पालखीतळ, मुक्कामाच्या पूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळाप्रमुख, दिंडीप्रमुखांशी संवाद साधून सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास असणार्या वारकर्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
विधान भवन येथे शनिवारी पालखी सोहळा आणि कोरोना साथीच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी ते बोलत होते. (Latest Pune News)
पवार म्हणाले, पालखी सोहळ्यादरम्यान वारकर्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येई. पावसाच्या पार्श्वभूमीवर विसाव्याच्या, पालखी मार्गावरील राडारोडा दूर करावा, रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत, काम वेगाने पूर्ण करावे. पालखी जाईपर्यंत सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना कराव्यात.
पीएमआरडीएच्या मेट्रोच्या कामामुळे रस्त्याच्या बाजूला असलेले बांधकाम साहित्य त्वरित बाजूला करावे. महावितरणने संपूर्ण पालखी मार्गावर आपली अधिकारी- कर्मचार्यांचे पथक सतर्क आणि कार्यरत ठेवण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी यावेळी दिल्या.
आजारी असलेल्या वारकर्यांची तपासणी, उपचार तातडीने होतील यासाठी आवश्यक ते तपासणीची व्यवस्था, औषधे पालखीमार्गावरील आरोग्य पथकाकडे ठेवावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
पालखीचे रिअल टाईम
ट्रॅकिंगसाठी पालखी ट्रॅकिंगचे लोकार्पण करण्यात आले. तसेच पुणे पोलिस आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणार्या ’प्रोजेक्ट वारी’ या संगणकीय उपक्रमाचेही लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत वारकर्यांची संख्या मोजण्यात येणार असल्यामुळे भविष्यात अचूक नियोजनासाठी उपयोग होणार आहे.
पवार म्हणाले, कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. काही देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत. सध्या केरळ पाठोपाठ महाराष्ट्रात रुग्ण आहेत. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये करोनाच्या रुग्णांची स्थिती नियंत्रणात आहेत. राज्याचा आढावा आम्ही घेतो. आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर स्वतः लक्ष ठेऊन आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी. सर्दी, खोकला असल्यास त्यासाठी रुमाल वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.