Cancer Pudhari
पुणे

Environment Pollution Cancer Risk: वाढते तापमान व प्रदूषणामुळे कर्करोगाचा धोका वाढतोय; तज्ज्ञांचा इशारा

हवा-पाणी प्रदूषण आणि कडक उन्हामुळे त्वचा, फुफ्फुसे व रक्त कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वाढते तापमान, कडक ऊन आणि वाढते वायू-पाणी प्रदूषण यांचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होत असून, त्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः त्वचा, फुफ्फुसे, मूत्राशय तसेच रक्त व हाडांशी संबंधित कर्करोगांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढताना दिसत आहे. भारतात दर वर्षी सुमारे 15 लाख नवीन रुग्णांची नोंद असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सध्या देशात 50 लाखांहून अधिक कॅन्सरचे रुग्ण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ओझोन थराचा ऱ्हास झाल्याने सूर्याच्या अतिनील किरणांचा थेट परिणाम त्वचेवर होत आहे. परिणामी ‌’मेलानोमा‌’ आणि ‌’नॉन-मेलानोमा‌’ प्रकारच्या त्वचेच्या कर्करोगांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कडक उन्हात दीर्घकाळ राहणे हे यामागील प्रमुख कारण मानले जात आहे. त्याचबरोबर हवेतील सूक्ष्म प्रदूषक कण, वाहनांचा धूर आणि औद्योगिक रसायने श्वासावाटे शरीरात प्रवेश करत असल्याने फुफ्फुसांच्या पेशींना हानी पोहोचते.

धूमपान न करणाऱ्या व्यक्तींमध्येही प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग आढळून येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. औद्योगिक रसायने आणि जड धातूंमुळे हवा व पाणी प्रदूषित होत आहे. त्याचा परिणाम मूत्राशयाच्या कर्करोगावरही होत आहे. तसेच ‌‘बेंझिन‌’सारख्या विषारी वायूंशी सातत्याने संपर्क आल्यास रक्त आणि हाडांच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

हवेची गुणवत्ता सातत्याने घसरते आहे. दूषित हवेमुळे फुफ्फुसाचा कर्करोग, तर दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या आतड्यांचे कॅन्सर, किडनी, लिव्हर, ब्लड कॅन्सर आदी कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: शिरवळ, मालेगाव, सुरत, उजनी धरणाजवळचा परिसर आदी ठिकाणी कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोणते रसायन किती प्रमाणात जाते, त्यानुसार कर्करोगाचा प्रकार आणि तीवता ठरते. पिकांवरील किटकनाशकांच्या अतिवापरामुळे महिलांमध्ये बेस्ट कॅन्सर, तर पुरुषांमध्ये प्रोटेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. ध्वनिप्रदूषणामुळे मेंदूचा कर्करोग होऊ शकतो. सध्या जगभरात कर्करोगावरील 900 हून अधिक औषधे उपलब्ध आहेत. मात्र, एकही औषध 100 टक्के कर्करोग बरा होण्याची निश्चिती देत नाही.
डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन
संतुलित आहार, अँटी-ऑक्सिडंट्‌‍सयुक्त फळे-भाज्या आणि नियमित वैद्यकीय तपासणी गरजेची आहे. कर्करोगाचे निदान झाल्यास शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिएशन आणि इम्युनोथेरपीसारख्या आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध असल्याने घाबरून न जाता वेळेत उपचार घेणे गरजेचे असते. वाढते प्रदूषण आणि तापमान ही केवळ आरोग्याची नव्हे, तर पर्यावरणाचीही गंभीर समस्या असून, झाडे लावणे आणि प्रदूषण नियंत्रण हाच यावर दीर्घकालीन उपाय आहे.
डॉ. संकेत बनकर, कर्करोगतज्ज्ञ, रुबी हॉल क्लिनिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT