पुणे; पुढारी वृत्तसेवा : अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला व्यक्ती सामान्य नोकरी करतो, असे गृहीत धरले तरी त्याला 20 ते 25 हजार रुपये पगार मिळतो. अभियांत्रिकीची पदवी असणारा पती मजुरी करतो ही बाब विश्वासार्ह वाटत नाही. अभियांत्रिकीची पदवी घेतलेली व्यक्ती काहीतरी नोकरी किंवा व्यवसाय करून उत्पन्न मिळवते, असे गृहीत धरण्यास अडचण दिसून येत नसल्याचे नमूद कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांनी पत्नीला दरमहा 12 हजार रुपये पोटगी देण्याचा अंतरिम आदेश दिला.
याप्रकरणात पत्नीच्या वतीने अॅड. सुधीर मुळे, अॅड. भाग्यश्री गुजर- मुळे आणि अॅड. वृषाली नवले यांच्यातर्फे पोटगीचा अर्ज दाखल केला होता. त्यानुसार न्यायालयाने पत्नी व दोन मुलींसाठी प्रत्येकी चार हजार रुपये अशी 12 हजार रुपये अंतरिम पोटगी अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून ते दाव्याच्या अंतिम निकालापर्यंत देण्याचा आदेश पतीला दिला आहे. अनुराग आणि प्रेरणा (नावे बदललेली आहेत) यांचा 2018 ला विवाह झाला होता. पहिली मुलगी झाली म्हणून अनुराग आणि त्याच्या घरच्यांनी छळ केला. त्यानंतर दुसर्यांदा गरोदर असताना अनुराग आणि त्याच्या घरच्यांनी मारहाण करून घराच्या बाहेर काढले.
दुसरी मुलगी झाल्याने अनुराग आणि त्याच्या घरचे मला व मुलीला भेटायला आले नाही. तसेच पतीने नांदवण्यास नकार दिला, असे पत्नीने दाखल केलेल्या पोटगीच्या दाव्यात नमूद आहे. प्रेरणा यांनी स्वतःच्या आणि दोन मुलींसाठी पोटगीसाठी न्यायालयात अर्ज केला. अनुराग इंजिनिअर आहे. मात्र, पत्नी व मुलींना पोटगी मिळू नये, यासाठी त्याने त्याच्या उत्पन्न व दायित्वाच्या शपथपत्रामध्ये तो बांधकाम मजूर असल्याचे नमूद केले आहे, असे अॅड. मुळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर न्यायालयाने हा आदेश दिला.
हेही वाचा