पुणे: अभियांत्रिकी अन् एमबीए प्रथम वर्ष प्रवेशाच्या तीन फेर्या पूर्ण झाल्या असून, अभियांत्रिकीचे 95 हजारांवर, तर एमबीएचे 32 हजारांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. आता प्रवेशाची चौथी फेरी सुरू झाली आहे, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली आहे.
बीई/बीटेक अभ्यासक्रमासाठी 1 लाख 83 हजार 760 जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी राज्यातील 1 लाख 89 हजार 277 उमेदवारांनी पर्याय भरले होते. ’अभियांत्रिकी’च्या तीन फेर्या पूर्ण झाल्यानंतर 95 हजार 253 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तिसर्या फेरीसाठी राज्यातील 1 लाख 19 हजार 23 उमेदवारांनी पसंतीक्रम भरले होते. त्यापैकी 98 हजार 55 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले. (Latest Pune News)
ज्या विद्यार्थ्यांना एक ते सहा पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे, अशा विद्यार्थ्यांना 22 ते 25 ऑगस्टअखेरपर्यंत संस्थेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली. तर, चौथ्या आणि शेवटच्या कॅप फेरीसाठी 26 ऑगस्टला रिक्त जागा जाहीर करण्यात येणार आहे. ’अभियांत्रिकी’च्या पहिल्या फेरीत 34 हजार 931 आणि दुसर्या फेरीत 29 हजार 910 आणि तिसर्या फेरीत 30 हजार 912 अशा एकूण 95 हजार 253 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, आता प्रवेशासाठी चौथी फेरी सुरू करण्यात आली आहे.
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया दृष्टिक्षेपात
प्रवेशाच्या जागा : 1,83,760
एकूण अर्ज भरलेले : 2,17,330
पहिल्या फेरीत अॅलॉट झालेल्या जागा : 1,44,776
पहिल्या फेरीत प्रवेश घेतलेले : 34,931
दुसरी फेरीत अॅलॉट झालेल्या जागा : 1,62,205
दुसर्या फेरीत प्रवेश घेतलेले : 29910
तिसर्या फेरीत अॅलॉट झालेल्या जागा : 98055
तिसर्या फेरीत प्रवेश घेतलेले : 30912
एमबीएमध्ये आत्तापर्यंत 32 हजार 636 प्रवेश
मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात एमबीएच्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या तीन फेर्या पूर्ण झाल्या असून, 32 हजार 636 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. आता प्रवेशाची चौथी फेरी सुरू झाली आहे, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली आहे. एमबीएच्या तिसर्या फेरीसाठी राज्यातील 13 हजार 893 उमेदवारांनी पसंतीक्रम भरले होते. यापैकी 10 हजार 390 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले.
चौथ्या फेरीतील प्रवेशासाठी महत्त्वाच्या तारखा
प्रवेशासाठी रिक्त जागा जाहीर करणे - 26 ऑगस्ट
महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरणे - 28 ते 30 ऑगस्ट
चौथ्या फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर करणे - 1 सप्टेंबर
महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे - 2 ते 4 सप्टेंबर