

पुणे: गणेशोत्सव सण जवळ आल्याने शहरात बाजारपेठा, मंडई, मॉल्स आणि गर्दीच्या ठिकाणी मोठी गर्दी उसळते. या गर्दीचा फायदा घेत चोरटे नागरिकांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारण्याची शक्यता वाढते. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव आला की विविध मंडळांकडून वर्गणी गोळा केली जाते. मात्र, याच वेळेस काही गुंड प्रवृत्तीचे लोक मंडळांशी संबंध नसताना सक्रिय होतात व जबरदस्तीने वर्गणी मागण्याच्या नावाखाली खंडणी उकळण्याचा प्रयत्न करतात. व्यापारी व नागरिकांना धमकावून पैशांची वसुली केली जाते. अशा प्रकारांना थारा देऊ नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (Latest Pune News)
गणेशोत्सवात खरेदीसाठी बाहेर पडताना नागरिकांनी, विशेषत: महिलांनी सोनसाखळी, अंगठ्या, दागिने यांसारख्या मौल्यवान वस्तू घालून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. गर्दीत कुठल्याही क्षणी चोरटे सक्रिय होतात, असा मागील अनेक वर्षांचा अनुभव आहे.
शहरातील विविध ठिकाणी एरवीही मोबाईल चोरी, सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार घडत असतात. सणासुदीच्या दिवसांत अशा घटनांमध्ये वाढ होते. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना सावधानता बाळगावी तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले.
मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत
गणेश मंडळांनीही आपल्या मंडप परिसरात सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी स्पष्ट सूचना पोलिसांनी दिली आहे. मंडळ परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमते. अशा वेळी संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे आणि तातडीने पोलिसांना संपर्क करावा.