Engineering Admission Pudhari
पुणे

Engineering Admission Extension: अभियांत्रिकी प्रवेशाला मुदतवाढ नाही; ४० ते ४५ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता!

बी. आर्किटेक्चर, एम. आर्किटेक्चरला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; अभियांत्रिकी विद्यार्थ्यांवर अन्याय का? पालक, संस्थाचालकांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

गणेश खळदकर

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील तंत्रशिक्षणांतर्गत बी. आर्किटेक्चर आणि एम. आर्किटेक्चरच्या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. परंतु, अभियांत्रिकी प्रवेशाला मात्र कोणतीही मुदतवाढ जाहीर करण्यात आलेली नाही. अभियांत्रिकीच्या प्रवेशाची मुदत संपल्यामुळे ४० ते ४५ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत दुजाभाव का? असा प्रश्न आता संस्थाचालकांसह विद्यार्थी, पालकांनी उपस्थित केला आहे.

यंदा अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत २ लाख ३ हजार २९३ जागा उपलब्ध होत्या. चौथ्या फेरीअखेर ७४.९९ टक्के म्हणजे १ लाख ५२ हजार ४५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर संस्थास्तरावरील प्रवेशासाठी कॅपच्या ५० हजार ८४१ आणि व्यवस्थापन कोट्यात १५ हजार ६८३ अशा ६६ हजारांवर जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी मुदत संपेपर्यंत साधारण २० ते २१ हजार जागा भरण्यात आल्या आहेत. तर अजूनही प्रवेशासाठी ४० ते ४५ हजार जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या सुधारित वेळापत्रकानुसार तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १४ सप्टेंबर अंतिम तारीख निश्चित करण्यात आली. त्यामुळे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया तसेच संस्थास्तरीय रिक्त जागांची प्रवेश प्रक्रिया याच मुदतीत पूर्ण कराण्याचे निर्देश देण्यात आले. परंतु, वास्तुकला परिषद, नवी दिल्ली यांच्या ११ सप्टेंबर २०२६ रोजीच्या सुधारित परिपत्रकाच्या आधारे आर्किटेक्चर अभ्यासक्रमांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर अभियांत्रिकी प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ का दिली जात नाही? असा प्रश्न आता पालक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

एकाच आठवड्यात संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया कशी होणार?

चार केंद्रीभूत प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी आपला प्रवेश रद्द करून इतर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. अशा विद्यार्थ्यांची संख्या साधारणपणे एकूण प्रवेशाच्या १० टक्क्यांपर्यंत असू शकते. त्यामुळे प्रत्यक्ष उपलब्ध जागांची संख्या सातत्याने बदलत राहते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांशी व पालकांशी संपर्क साधणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आणि प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे हे महाविद्यालयांसाठी अत्यंत आव्हानात्मक झाले आहे. संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया ८ ते १४ सप्टेंबरदरम्यान पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. एवढ्या कमी कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ मिळणे गरजेचे असल्याचे मत संस्थाचालकांनी व्यक्त केले आहे.

इतक्या मोठ्या संख्येने उपलब्ध असलेल्या जागा केवळ एका आठवड्यात भरून काढणे हे महाविद्यालये, विद्यार्थी आणि पालक या सर्वांसाठीच अत्यंत कठीण आहे. प्रवेशाची अंतिम मुदत, उपलब्ध जागा आणि विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी लागणारा वेळ यांचा समतोल साधण्यासाठी प्रवेश प्रक्रियेसाठी अधिक कालावधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची अधिक संधी मिळेल आणि महाविद्यालयांनाही उपलब्ध जागा गुणवत्तापूर्ण पद्धतीने भरता येतील.
प्रा. उद्धव शिद, संचालक, झील एज्युकेशन सोसायटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT