पुणे

अतिक्रमणे हटवणार; लेंडी ओढ्याच्या पाहणीनंतर चालवणार बुलडोझर!

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

नर्‍हे गावातील लेंडी ओढा आणि पिराच्या ओढ्यात झालेल्या अतिक्रमणांची महापालिकेच्या अधिकार्‍यांकडून पाहणी केली जाणार आहे. या पाहणीनंतर ओढ्यावरील अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार असल्याची महिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार आणि रवींद्र बिनवडे यांनी दिली. महापालिका हद्दीत नव्याने सामावेश झालेल्या नर्‍हे गावाच्या हद्दीतून वाहणार्‍या लेंडी ओढ्याचा उगम स्वामिनारायण मंदिरापाठीमागे होतो. मात्र, या ओढ्याचे अस्तित्व येथे कोठे दिसते, तर कोठे काहीच दिसत नाही. ओढ्यात उगमापासून संगमापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.

या अतिक्रमणांमुळे या ओढ्याचे पात्र कुठे तीन फूट तर कुठे पाच ते दहा फूट आहे. त्यातच ओढ्याच मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि कचरा टाकण्यात आला आहे. काही ठिकाणी ओढ्यावर स्लॅब आहे. काही ठिकाणी मिळकतधारकांनी भराव टाकून ओढ्याची जागा बळकवली आहे. अनेक ठिकाणी इमारतींसाठी ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह वळविण्यात आला आहे. हीच परिस्थिती या गावातून वाहनार्‍या पिराच्या ओढ्याची आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून शहरातील ओढे व नाले साफसफाई करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, पावसाळा तोंडावर आला तरी प्रशासनाने नर्‍हे गावातील दोन्ही ओढ्यांमधील अतिक्रमणे व राडारोड्याकडे ढुंकूनही पाहताना दिसत नाही.

या पार्श्वभूमीवर दैनिक पुढारीने लेंडी ओढ्यातील अतिक्रमणाचे वृत्त गुरुवारी प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. प्रशासनाने अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.महापालिकेच्या बांधकाम विभागातील आणि मलःनिस्सारण विभागातील अधिकारी संयुक्तपणे ओढ्याची पाहणी करणार आहेत. या पाहणीत अतिक्रमण मिळकतींचा सर्व्हे करून त्यांना नोटीस देऊन कारवाई करणार असल्याचे डॉ. खेमनार आणि बिनवडे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT