सेालापूर : उजनीच्या पाण्यासाठी तृतीयपंथीही सरसावले | पुढारी

सेालापूर : उजनीच्या पाण्यासाठी तृतीयपंथीही सरसावले

सेालापूर ; पुढारी वृत्तसेवा : उजनी धरणातून सोलापूरच्या हक्काचे पाणी पळवण्याचा घाट घातलेल्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात उजनी बचाव संघर्ष समिती व युवा भीम सेना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी तृतीयपंथीयांनी घागर मोर्चा काढला. यावेळी पोतराजाच्या वेषात आसूड ओढून आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनप्रसंगी उजनीच्या पाण्याने दगडाला जलअभिषेक करण्यात आला. डोक्यावर घागर घेऊन तृतीयपंथीयांनी पालकमंत्री हाय हाय, पालकमंत्री बाय-बाय अशी घोषणाबाजी करत उपस्थितांचे लक्ष वेधले. या आंदोलनात संघर्ष समितीचे अतुल खुपसे, युवा सेनेचे महेश डोलारे, राज सलगर यांच्यासह भीम युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सोलापूरची जनता पाण्यावाचून हैराण झाली असताना येथीलच पाणी पालकमंत्री पळवून नेत आहेत. पालकमंत्र्यांनी याबाबत लवकर धोरण जाहिर करावे, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. शहराची परिस्थिती पाण्याबाबत ग्रामीण भागापेक्षा वाईट आहे. याचा विचार पालकमंत्र्यांनी करावा व निर्णय पाणी पळविण्याचे धोरण रद्द करावे, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

सोलापूर शहरात सध्या आठ दिवसात एकदा पाणी येत आहे.त्यामुळे नागरिक हैराण आहेत. आम्हाला भाकरीसाठी फिरावे लागते आता पाण्यासाठी फिरावे लागत आहे. पाणी वेळेवर देण्यापेक्षा आमचेच पाणी पालकमंत्री पळवून नेत असल्याने पालकमंत्री भरणे यांचा आम्ही निषेध करतो, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

Back to top button