पुणे

येरवडा : पालखी मार्गावर अतिक्रमणांचा विळखा

अमृता चौगुले

येरवडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्‍या पदपथांवर स्टॉलधारकांनी अतिक्रमणे केली आहेत. पालखी मार्गावरील पदपथांचीदेखील अशीच अवस्था आहे. जी 20 व पालखीच्या स्वागतासाठी महापालिका रस्ता व चौकांच्या सुशोभीकरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत असताना अतिक्रमणांनी व्यापलेले पदपथ मोकळे कधी करणार? असा प्रश्न नागरिक यानिमित्ताने उपस्थित करू लागले आहेत. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्‍या पालखी मार्गावरील आळंदी रस्त्यावरील आरटीओजवळ तसेच हुतात्मा उद्यानासमोरील पदपथ पूर्णतः अतिक्रमणांनी व्यापून गेले आहेत.

या ठिकाणी परवानाधारक आणि विनापरवानाधारक पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. इतकेच नव्हे, तर जागा व्यापण्यासाठी भिंतीवर नावे लिहून ठेवली आहेत. दुसर्‍या जागेचा परवाना असणारे देखील या ठिकाणी जागा व्यापून बसले आहेत. असाच प्रकार बदामी चौकापासून ते ईशान्य मॉलपर्यंत सुरू असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही बाजूंचे पदपथ अनधिकृत पथारी व्यावसायिकांनी व्यापले आहेत. या ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थ शिजविले जात असताना महापालिका आरोग्य विभाग आणि अतिक्रमण विभाग काहीही कारवाई करीत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अतिक्रमण विभागाकडून कारवाई होत नसल्याने क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील सर्वच पदपथ व्यापून गेले आहेत. अतिक्रमण विभागाने परवाना नसलेल्या तसेच जागा सोडून इतर ठिकाणी स्टॉल लावणार्‍या, परवाना भाड्याने देणार्‍या पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आरटीओजवळ व बदामी चौकातील पदपथ पथारी व्यावसायिकांनी व्यापून टाकले आहेत. पायी चालण्यासदेखील जागा शिल्लक नाही. पालखी सोहळा व जी 20 परिषदेनिमित्त शहरात वारकरी व परदेशी पाहुण्यांचे आगमन होणार आहे. त्यासाठी रस्ते व चौकांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. मात्र, पदपथांवरील अतिक्रमणांवर कारवाई केली जात नाही.

– सुशांत पोस्टे, सामाजिक कार्यकर्ते, येरवडा

अतिक्रमणे झालेल्या पदपथांचे लवकरच सर्व्हे करून अधिकृत परवाने तपासले जातील. परवाना नसलेल्या तसेच जागा बदलून व्यवसाय करणार्‍यांवर कारवाई केली जाईल. परवानाधारकांनी आपल्या जागा भाड्याने दिल्या असल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील.

– धनंजय नेवसे, अतिक्रमण निरीक्षक, येरवडा क्षेत्रीय कार्यालय

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT