Doctor Robbery Pudhari
पुणे

Pune Doctor Robbery Emergency Call: इमर्जन्सी कॉलच्या बहाण्याने डॉक्टरला चाकूच्या धाकाने लूट

पुणे-सातारा रस्त्यावर थरार; डॉक्टर जखमी, दोन चोरटे पसार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: रुग्ण तपासणीच्या बहाण्याने म्हणजे इमर्जन्सी कॉल करून बोलावून एका डॉक्टरला चाकूच्या धाकाने लुटण्यात आल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील एका सोसायटीच्या आवारात घडली. याप्रकरणी पसार झालेल्या दोन चोरट्यांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 49 वर्षीय डॉक्टरांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 31 डिसेंबर रोजी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास सातारा रोड परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टरांचा खासगी दवाखाना आहे. ते कात्रज भागात राहायला आहेत. बुधवारी (दि.31 डिसेंबर) रात्री नऊच्या सुमारास चोरटे त्यांच्या दवाखान्यात गेले. ‌’एक रुग्ण अत्यवस्थ आहे. त्याची तपासणी करायची आहे‌’, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर चोरटे त्यांना घेऊन पुणे-सातारा रस्त्यावरील अथर्व परिहाज इमारतीच्या तळमजल्यावर घेऊन गेले.

त्यानंतर चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखविला. एका चोरट्याने त्यांच्या बोटावर चाकूने वार केला. चोरट्याबरोबर असलेल्या साथीदाराने डॉक्टरांकडील दुचाकीचा ताबा घेतला. डॉक्टरांच्या पिशवीत 30 हजारांची रोकड, मोबाईल असा एक लाख रुपयांचा चांदीचा जग असा मुद्देमाल होता. दुचाकी, मोबाईल संच, रोकड, चांदीचा जग असा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर घाबरलेल्या डॉक्टरांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार, सहायक निरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या वर्णनानुसार चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिस उपनिरीक्षक सद्दाम फकीर तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT