पुणे

पतसंस्थेत सव्वादोन कोटींचा अपहार; तिघांवर गुन्हा

Sanket Limkar

बारामती : पुढारी वृत्तसेवा : पदाचा, अधिकाराचा दुरुपयोग करून संस्था व सभासदांचा विश्वासघात करीत पतसंस्थेत सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तिघांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील शाकंभरी नागरी सहकारी पतसंस्थेत हा प्रकार घडला.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संस्थेचे तत्कालीन चेअरमन अनिल बबनराव गलांडे (रा. अशोकनगर, बारामती), तत्कालीन सचिव मुकुंद महादेव गिजरे (रा. सातव गल्ली, कसबा, बारामती) आणि मंजुश्री विठ्ठल दुगम (रा. गोकूळवाडी, कचेरी रोड, बारामती) यांचा समावेश आहे. शासनाचे विशेष लेखापरीक्षक सुनील मथुरा काळे (रा. वडगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाकंभरी नागरी सहकारी पतसंस्थेत घडला प्रकार

फिर्यादीत नमूद केल्यानुसार 1 एप्रिल 2010 ते 31 मार्च 2022 या कालावधीत शाकंभरी पतसंस्थेत हा प्रकार घडला. या तिघांकडून कर्ज व्यवहारात गैरव्यवहार करीत 2 कोटी 18 लाख 77 हजार रुपयांचा अपहार करण्यात आला. कट रचून खोटी व बनावट कर्ज प्रकरणे तयार केली गेली. कर्ज खतावणीमध्ये चुकीच्या नोंदी नोंदवून सहकारी कायदा, पोटनियमांचे उल्लंघन करण्यात आले. विनातारण कर्ज देऊन तसेच अपुर्‍या कागदपत्रांच्या आधारे तारणी कर्ज वाटप करून संस्थेची व ठेवीदारांची फसवणूक करून स्वतःच्या पदाचा गैरवापर करीत संगनमताने विश्वासघात करून फसवणूक केली.

याप्रकरणी बारामतीच्या सहायक निबंधक (सहकारी संस्था) यांनी फिर्यादीला संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी शासनातर्फे प्राधिकृत केले होते. त्यानुसार त्यांच्याकडून फिर्याद देण्यात आली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT