पुणे: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून अद्याप महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार (दि. 11) ते शनिवार (13 सप्टेंबर) दरम्यान एक शेवटची फेरी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या फेरीतील प्रवेशासाठी आज शनिवार (दि.13) शेवटचा दिवस असणार आहे.
राज्यात अकरावी प्रवेशासाठी आत्तापर्यंत तब्बल 13 लाखांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून प्रवेशासाठी अद्यापही साडेआठ लाखांच्या आसपास जागा रिक्तच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Pune News)
अकरावी प्रवेशासाठी राज्यात नऊ हजार 548 महाविद्यालयांमध्ये 18 लाख 23 हजार 960 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच तीन लाख 45 हजार 697 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 21 लाख 69 हजार 657 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 14 लाख 85 हजार 686 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
त्यापैकी 11 लाख 57 हजार 352 विद्यार्थ्यांनी कॅपमधून तर एक लाख 68 हजार 134 विद्यार्थ्यांनी कोटाअंतर्गत अशा 13 लाख 25 हजार 486 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आता प्रवेशासाठी अद्यापही सहा लाख 66 हजार 608 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच एक लाख 77 हजार 563 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण आठ लाख 44 हजार 171 जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.
अकरावी प्रवेशासाठी अनेक फेऱ्या राबवूनही विद्यार्थी प्रवेशाकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे वारंवार फेऱ्या राबवून देखील यंदा अकरावीची तब्बल साडेआठ लाखांच्या आसपास बाके रिकामीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.