बारामती: थेट पोलिस ठाण्यातच महिला पोलिस हवालदाराने लाच घेण्याचा प्रकार बारामती तालुका पोलिस ठाण्यात घडला. या प्रकारामुळे पोलिस ठाण्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली. एकीकडे अवैध धंद्यांचा झालेला सुळसुळाट आणि वाढलेली गुन्हेगारी असे चित्र असताना आता थेट पोलिस ठाण्यातच लाच स्वीकारली गेल्याने बारामतीत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
बारामती तालुका पोलिस ठाणे गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांनी चर्चेत आहे. येथे यापूर्वी सुद्धा लाचखोरीचे प्रकार घडले आहेत. याशिवाय पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल बारामतीत सातत्याने बोलले जात आहे. (Latest Pune News)
एका पोलिस हवालदाराला निलंबित करण्याचा प्रकारही येथे यापूर्वी घडला. त्यातून कोणताही बोध अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला नसल्याचेच बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झालेल्या कारवाईने स्पष्ट झाले.
बारामती एमआयडीसी, बारामतीची उपनगरे व लगतचा परिसर या पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येतो. एकीकडे बारामती कमालीची विस्तारत असताना शहरालगतच्या या भागातील जमिनींना सोन्याचा भाव आला आहे.
पालखी महामार्गासाठी झालेल्या भूसंपादनातून देखील कोट्यवधी रुपये या परिसरात आले. सहाजिकच या भागात अवैध धंदे फोफावले, गुंठामंत्री तयार झाले आणि त्यातून गुन्हेगारी वाढली. अलीकडील काळात या पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली आहे. बुधवारी रात्रीच पारवडीत खुनाची घटना घडली. त्यातील आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटकही केली, परंतु अनेक दाखल गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याची सर्वसामान्यांची ओरड आहे.
पतीचे काही हजार रुपये येणे बाकी असल्याच्या नावाखाली चक्क त्याच्या पत्नीच्या नावे असलेली मोटार चोरून नेण्याचा प्रकार घडला. यातील फिर्यादी महिला दोन महिने चकरा मारत असताना तालुका पोलिसांना चोर सापडला नाही. या कासवगतीच्या कार्यशैलीचा फटका ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनाच बसला.
त्यांनी आपल्या वहिनी रशिदा खान यांच्या नावे ही मोटार घेतली होती, तीच अजित शिवाजी मैंद नावाच्या व्यक्तीने चोरून नेली. परंतु पोलिसांकडून न्याय मिळाला नाही. अशी अनेक प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांचा पोलिस ठाणे परिसरात वावर वाढला आहे. तक्रारदाराला बाहेरच गाठून काही महिला सामाजिक कार्यकर्त्या त्यांच्याशी तडजोड करत असल्याच्या चर्चा आहेत.
एमआयडीसी परिसरातील अनेक लॉजमध्ये खुलेआम चुकीचे प्रकार सुरू आहेत. एमआयडीसीतील वेगवेगळे मॉल, हॉटेल्स येथे तरुणाईकडून अनेक चुकीचे प्रकार केले जात आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना अपयश येताना दिसते आहे. या पोलिस ठाण्याला खमक्या अधिकाऱ्यांची गरज आहे. एकीकडे अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी बारामतीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी काम करत असताना तालुका पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्यापुढे अडथळे निर्माण होत आहेत.
एक दिवसाची पोलिस कोठडी
दाखल गुन्ह्यात गेट जामीन करून देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करत 20 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेल्या अंजना बिभिषण नागरगोजे या महिला पोलिस हवालदाराला गुरुवारी (दि. 11) बारामतीत जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्यापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने शुक्रवार (दि. 12) पर्यंत एक दिवसाची पोलिस कोठडी त्यांना सुनावली. अर्थात लाचखोरीचे हे प्रकरण म्हणजे हिमनगाचे टोक असल्याचे बोलले जात आहे.