मारहाण file Photo
पुणे

Uruli Kanchan Election: निवडणूक वादातून हिंसाचार; भाजप उमेदवाराच्या घरात घुसून रॉडने मारहाण

उरुळी कांचनच्या पेठ गावात थरार; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

उरुळी कांचन : निवडणुकीत झालेल्या वादाचे पर्यवसान भांडणात होऊन भाजपच्या पंचायत समितीच्या उमेदवाराच्या घरात घुसून त्यास रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार पेठ (ता. हवेली) येथे घडला. याप्रकरणी पाच जणांवर उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी कोरेगाव मूळ पंचायत समितीचे भाजपचे उमेदवार सुरज भालचंद्र चौधरी (वय 33, रा. चारवाडा, पेठ, ता. हवेली) असे मारहाण झालेल्या उमेदवाराचे नाव आहे. त्यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार विजय रामचंद्र चौधरी, ओम विजय चौधरी, तानाजी विलास चौधरी, हर्शद राजेश चौधरी, विशाल दीपक चौधरी (सर्व रा. पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या वादानंतर रविवारी (दि. 8) सकाळी 11 च्या सुमारास उमेदवार सुरज चौधरी हे त्यांचे भाऊ अक्षय, संदेश, वडील भालचंद्र, आई शोभा, पत्नी संध्या, भावजय सानिका व लहान मुले असे यांच्यासमवेत घरात बसले होते. या वेळी शिवीगाळ करीत विजय रामचंद्र चौधरी, त्यांचा मुलगा ओम विजय चौधरी हे त्यांच्या घरात घुसले. विजय चौधरी यांच्या हातात चाकू, तर ओम चौधरीकडे रॉड होता.

त्यांनी भालचंद्र चौधरी यांना मारहाण केली. या वेळी फिर्यादी यांचा भाऊ अक्षय मध्ये आला असता विजय चौधरीने त्याच्या हातातील चाकू त्यांच्या पोटावर मारून दुखापत केली. तसेच, आई शोभा यांना विजय व त्याचा मुलगा ओमनेसुध्दा मारहाण केली. त्यानंतर घरातील सामानाची तोडफोड करून ते निघून गेले. घरातील 1 लाख रुपयांची रक्कम चोरी केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार वरील आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT