पुणे

ज्येष्ठांनो काळजी घ्या : शहर पुन्हा गारठले

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शुक्रवारी अचानक शहराचा पारा 15 अंशांवरून 12 ते 13 अंशांवर खाली आला. आगामी तीन दिवस शहरात थंडीची लाट तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, पहाटेचे तापमान 9 ते 10 अंशाखाली जात असल्याने डॉक्टरांनी ज्येष्ठ नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. गेले दोन-तीन दिवस शहराच्या किमान तापमानात वाढ झाल्याने सायंकाळचा गारठा किंचित कमी जाणवत होता. मात्र, शुक्रवारी किमान तापमान 15 अंशांवरून 12 ते 13 अंशांवर खाली आले. शिवाजीनगरचा पारा 15 वरून 13.3, तर एनडीए भागाचा पारा 14.5 अंशांवरून 12.3 अंशांवर खाली आला होता.

पहाटेचे तापमान 9 ते 10 अंशांवर…

शहरात दिवसभराचे सरासरी किमान तापमान 12 ते 13 अंशावर खाली आले आहे. मात्र, उत्तर रात्री ते पहाटेपर्यंत शहरात दाट धुके अन् थंडीचा कडाका जास्त जाणवत आहे. रात्री 11 नंतर शहर अधिक गारठू लागले आहे. पहाटे 3 ते सकाळी 8 पर्यंत शहराचे किमान तापमान 9 ते 10 अंशांवर खाली जाते, त्यामुळे या वेळेत थंडी जास्त जाणवत आहे.

तब्येतीची काळजी घ्या…

शहरात पहाटे थंडी जास्त असल्याने ज्येष्ठांनी फिरायला जातानाची वेळ बदलावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. थंडीमुळे हृदयविकार, अस्थमा आणि सीओपीडीचा त्रास असणार्‍या रुग्णांना जास्त त्रास होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

शहरात पहाटेच्या वेळी जास्त गारठा आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी पहाटे 4 ते 7 पर्यंतची वेळ फिरायला जाण्यासाठी टाळावी. त्यांनी थोडे उन्हं पडल्यावर फिरावयास जावे.

– डॉ. संजय राजकुंटवार, फॅमिली फिजिशियन

हेही वाचा

SCROLL FOR NEXT