पुणे: राज्यातील अतिवृष्टीचे संकट मोठे आहे. त्याचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह आपण बांधावर जाऊन पाहणी केली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये योग्य निर्णय घेऊ. ही वेळ राजकारण करण्याची नसून शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याची आहे, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिंदे म्हणाले, मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री आणि मी शेताच्या बांधावर जाऊन केली आहे. अतिवृष्टीचे हे संकट मोठे आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम सरकार करेल. (Latest Pune News)
शिंदे म्हणाले, ‘केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मदतीबाबत गृहमंत्री अमित शहा यांना सांगितले आहे. केंद्राने मदतीचा हात पुढे केला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्याची आहे. यात सरकार हात आखडता घेणार नाही.
केंद्रही मदत करेल, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंचनामे आणि मदतकार्य सुरळीत राहावे, यासाठी मंत्र्यांनी दौरे करू नयेत, असा सल्ला दिला होता. त्यावर शिंदे यांनी लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना बांधावर गेल्याशिवाय तेथील परिस्थिती कळणार नाही. घरात बसून परिस्थिती कळत नाही. त्यासाठी बांधावर गेल्यावर लोकांचे अश्रू, व्यथा दिसतात.
त्यानंतर नुकसान किती आहे, ते ठरवता येते. त्यामुळे या परिस्थितीत राजकारण न आणता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, शेतकऱ्यांना मदत करण्याचा हा काळ आहे, असा टोला शिंदे यांनी पवार यांना लगावला.