पुणे: ‘महापालिकेच्या पथ विभागाने 2023 मध्ये सुमारे 100 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले. नियमाप्रमाणे या रस्त्यांचा पाच वर्षांचा दोषदायित्व कालावधी होता. मात्र, कालावधी पूर्ण होण्याआधीच पालिकेच्या पाणी पुरवठा, ड्रेनेज विभागांसह केंद्र-राज्य सरकारी यंत्रणा आणि खासगी केबल कंपन्यांनी खोदाई केली.
परिणामी, दोषदायित्व कालावधी रद्दबातल ठरला आणि ठेकेदार जबाबदारीतून मुक्त झाले. हा प्रकार ट्रिपल इंजिन सरकारच्या मिलीभगतशिवाय शक्यच नाही,’ असा गंभीर आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. (Latest Pune News)
2023 मध्ये पॅकेजअंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात आली होती. मात्र, खोदाईमुळे एकाही रस्त्याचा दोषदायित्व कालावधी उरलेला नाही, असा कबुली जबाब पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिला आहे. गेल्या वर्षीच रस्त्यांच्या दुरुस्तीविषयी आपण प्रशासनाला प्रश्न विचारले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील पुण्यातील खड्ड्यांवर नाराजी व्यक्त केली होती, असे ‘आप’ने ठणकावले आहे.
हातमिळवणीतून सुरू ‘सोयीचा’ घोळ
आपण पुणे महापालिकेच्या पथ विभाग दालनात आंदोलन केले होते. त्या वेळी ‘कारवाई करू’ असे आश्वासन दिले गेले. पण आता वर्षभरानंतर ठेकेदारांना जबाबदारीतून मुक्त करून नागरिकांच्या पैशावर दुरुस्तीचा बोजा टाकण्यात आला आहे. ‘माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिकेचे प्रशासक आणि ठेकेदार यांनी वर्षानुवर्षे हातमिळवणीतून हा सोयीचा घोळ जाणीवपूर्वक जिवंत ठेवला आहे, असा आरोप ‘आप’चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला.