येरवडा: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणाची नियोजित जागा मिळवण्यासाठी एन. जी. व्हेन्चर या खासगी बांधकाम व्यावसायिक कंपनीने शासनाला भरलेले 60 कोटी 11 लाख रुपये परत द्या, अथवा पर्यायी जागा द्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एम.एस.आर.डी.सी कार्यकारी संचालक अनिलकुमार गायकवाड यांना देत 405, मंगळवार पेठ, पुणे या जागेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
405, मंगळवार पेठ ही जागा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीणासाठीच देण्यात येईल असे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांस्कृतिक भवन समिती शिष्टमंडळाला सांस्कृतिक भवन विस्तारीकरणाबाबतचा प्रस्ताव सादर करावे असेही सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्याबरोबर नागपूर विधान भवनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. यावेळी समितीचे समन्वयक शैलेंद्र मोरे, दीपक गायकवाड, निता अडसूळे, बबन अडसूळ, नितीन कांबळे, सिद्धार्थ ओव्हाळ, विनोद गायकवाड, सचिन साठे, विजय खुडे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशामुळे तसेच विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकारने आंबेडकर भवन विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी भावना समितीच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली.
नियोजित जागेवर स्मारक होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. तसेच जागेवर ताबा सांगत असलेल्या बांधकाम व्यावसायिकाने गुरुवारी जागेचा ताबा सोडला असून, त्या बांधकाम व्यवसायिकाला मुंबई येथे जागा देणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले आहे. यामुळे लवकरच सदर जागेवर स्मारक उभे राहण्याचा मार्ग खुला झाला आहे.शैलेश मोरे, समन्वयक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती