आई रागावल्याने आठवीतील मुलीने १३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागातील अमानोरा टाउनशिप परिसरात बुधवारी दुपारी घडली. या घटनेत १४ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू, अशी नोंद करण्यात आल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली. अल्पवयीन मुलगी, तिची आई, आठ वर्षांचा मुलगा, मावस भाऊ बुधवारी दुपारी घरी होते. दुपारी अडीचच्या सुमारास आईने मुलीला अभ्यासाला जा, असे सांगितले.
या कारणावरून मुलीला राग आला. त्यानंतर मुलीने १३ व्या मजल्यावरील मोकळ्या जागेतून उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली.