बारामती: बदलत्या काळात सौर उर्जेकडे वळणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे सौर उर्जेवर शेतीपंप चालावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील आठ लाख शेतकर्यांना सौर ऊर्जा पंप देण्यासाठी 24 हजार कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे वीज बिल कमी होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामती तालुक्यातील मुढाळे येथे महापारेषण कंपनीकडून 220 केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, महापारेषणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल कोलप आदी या वेळी उपस्थित होते. (Latest Pune News)
लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारली आहे. आता आम्ही या योजनेवर महिलांना कर्ज देणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सौर उर्जेचा वापर वाढण्याची आता गरज आहे. 1 लाख 30 हजार घरांसाठी 500 मॅगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा पंप शासनाने बसवले आहेत.
येणार्या काळात राज्यातील ग्राहकांचे 70 टक्के वीज बिल टप्प्या-टप्प्याने कमी होईल. यातील काही अभ्यासू तांत्रिक लोकांनी तर वीज बिल शून्यावर येईल असेही आम्हाला सांगितले आहे. पण, मी तो दावा करणार नाही, शून्यावर आले नाही तर लोक मला थापा मारतोय असे म्हणतील.
यंदाच्या वर्षी मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे, त्यामुळे शेतकर्यांना आवश्यक असणारी खते, बी-बियाणे लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. बारामती शहर आणि तालुका वेगाने बदलतो आहे.
ज्या ठिकाणी पाण्याची अडचण असेल तेथे तत्काळ टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्या, असे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. आम्ही सौर वीज उपलब्ध करून देत आहोत. त्याचाही फायदा होत आहे. मुढाळे येथील या वीज उपकेंद्रामुळे परिसरात विजेची कमतरता भासणार नाही. हे वीज उपकेंद्राचे काम एक वर्षात पूर्ण होईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही पवार म्हणाले.