पुणे

Education : शालेय शिक्षणात यंदा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण!

Laxman Dhenge
पुणे : उच्च शिक्षणात अंमलबजावणी सुरू असलेल्या आणि यंदा जोर धरणार्‍या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आता शालेय शिक्षणातदेखील केली जाणार आहे. यंदा पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी अभ्यासक्रम निर्मिती, एकसंध पहिली ते बारावीचे वर्ग आणि शैक्षणिक 'क्रेडिट'बरोबरच कला, क्रीडा, कार्यानुभव याअंतर्गत मिळालेल्या 'क्रेडिट'ला शालेय शिक्षणात महत्त्व दिले जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदा शालेय शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पायाभरणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीस येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरुवात होईल.  पहिल्या टप्प्यात पूर्वप्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार झाला आहे. त्यानुसार बालवाड्या आणि अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके मिळतील. त्याची छपाई बालभारतीमध्ये सुरू झाली आहे.  राज्यात आतापर्यंत तीन ते सहा वर्षे वयोगटातील पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी ठोस आराखडा नव्हता. नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होईल. हे धोरण टप्प्या-टप्प्याने पुढे जाणार आहे. 2030 पर्यंत या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे.
याची सुरुवात पूर्वप्राथमिक स्तरावरून होईल. लवकरच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल. तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांच्या क्षमतांना अधिक वाव मिळावा, असा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. शिक्षणातील विद्यार्थ्यांचा 'लर्निंग आउटकम' यापुढील काळात नोंदविला जाणार आहे. शैक्षणिक 'क्रेडिट'बरोबरच कला, क्रीडा, कार्यानुभव याअंतर्गत मिळालेल्या 'क्रेडिट'ला शालेय शिक्षणात महत्त्व दिले जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

दोन महिन्यांत तयारी अशक्य

नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीपूर्वी राज्यातील पूर्वप्राथमिकची शिक्षण व्यवस्था नियंत्रणात आणणे हा महत्त्वाचा भाग आहे. दुसरीकडे पूर्वप्राथमिकचे प्रवेश खासगी संस्थांनी उरकले आहेत. तसेच, आरटीई प्रवेश, अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया, दहावी-बारावीची परीक्षा पद्धत बदलण्यासाठी मोठा वेळ लागणार आहे. शिवाय, नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके, तसेच अभ्याससाहित्यांची तयारी पुढील दोन महिन्यांत शक्य नसल्याचे शालेय शिक्षण विभागातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

नव्या शैक्षणिक धोरणातील वैशिष्ट्ये

  • 10+2 ऐवजी आता शिक्षणाचा 5 +3 +3+ 4 पॅटर्न
  • पाचवीपर्यंत शिक्षण मातृभाषा, प्रादेशिक किंवा घरातील भाषेत
  • पूर्वप्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याचा प्रयत्न
  • सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश
  • विद्यार्थी स्वत:चे मूल्यांकन  स्वतःच किंवा सहविद्यार्थी, शिक्षक करणार
  • शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य मिळण्यावर भर
  • सरकारी आणि खासगीशाळांमधील शिक्षणात समानता
यंदापासून शालेय शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये यंदा पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात येणार असून, संपूर्ण राज्यात पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी एकच अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे. तसेच, हे वर्ग प्राथमिकला जोडणे आणि प्राथमिक शिक्षणात पाचवी आणि आठवीचे वर्ग चौथी आणि सातवीला जोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आवश्यक तेथे अकरावी-बारावीचे वर्ग जोडून एकसंध शाळा निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. या प्रमुख दोन गोष्टींची अंमलबजावणी यंदा करण्यात येणार आहे.
 – शरद गोसावी,  संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय
हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT