पाकिस्तानी बोटीत 600 कोटींचे ड्रग्ज; 14 जणांना अटक | पुढारी

पाकिस्तानी बोटीत 600 कोटींचे ड्रग्ज; 14 जणांना अटक

अहमदाबाद; वृत्तसंस्था : गेल्या 24 तासांत गुजरात आणि राजस्थानमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 900 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. तटरक्षक दलाने अरबीं समुद्रात थरारक पाठलाग करीत एका पाकिस्तानी बोटीतून 600 कोटी रुपयांचे हेरॉईन हस्तगत केले, तर एनसीबी आणि गुजरात एटीएसने केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरात व राजस्थानात ड्रग्जच्या कारखान्यांवर छापे टाकत 300 कोटींचे मेफेड्रॉन जप्त केले.

अरबी समुद्रात रविवारी थरार घडला. एनसीबीला मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानातून एका बोटीतून ड्रग्ज येणार होते. एनसीबी आणि तटरक्षक दलाने मोहीम आखली. तटरक्षक दलाची जहाजे आणि हेलिकॉप्टरचा वापर करून एक पाकिस्तानी बोट हेरण्यात आली. या बोटीला तटरक्षक दलाच्या जहाजांचा माग लागताच ही बोट वाकड्या तिकड्या मार्गाने तटरक्षक दलाच्या जहाजांना हुलकावण्या देत प्रवास करीत होती; पण तटरक्षक दलाच्या राजरत्न या वेगवान जहाजाने या पाकिस्तानी बोटीला गाठलेच. तटरक्षक दलाचे जवान या बोटीवर चढले. बोटीवरील 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली. या बोटीच्या झडतीत 86 किलो हेरॉईन सापडले. त्याची किंमत 600 कोटी रुपये असल्याचे तटरक्षक दलाने म्हटले आहे. अटक केलेल्या पाकिस्तान्यांना पोरबंदरला आणण्यात आले असून, तेथे त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

ऑपरेशन प्रयोगशाला

एकीकडे समुद्रात थरार सुरू असताना गुजरात एटीएस व एनसीबी यांनी संयुक्तपणे राजस्थान व गुजरातमधील ड्रग्जच्या कारखान्यांवर छापे टाकत 300 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन हस्तगत केले. मेफेड्रॉनचे उत्पादन करणारे तीन कारखाने चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राजस्थानातील जालोर जिल्ह्यातील भीनमाल व जोधपूर जिल्ह्यातील ओसियान आणि गुजरातमधील अमरेली येथे एकाचवेळी छापे टाकण्यात आले. त्यात पावडर आणि द्रव रुपातील मेफेड्रॉन हस्तगत करण्यात आले. त्याची बाजारातील किंमत 300 कोटी रुपये असल्याचे एनसीबीचे उप महासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी म्हटले आहे.

Back to top button