Ethanol Pudhari
पुणे

E20 Ethanol Blended Petrol: देशात E20 इंधन विक्री अनिवार्य; पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण

पेट्रोलियम मंत्रालयाची अधिसूचना; 150 कोटी लिटर इथेनॉल खरेदीच्या नव्या निविदांची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल आणि रिसर्च ऑक्टेन नंबर किमान 95 चे (आरओएन दर्जा) असलेल्या इथेनॉलमिश्रित मोटर स्पिरीट मिश्रण विक्रीसाठी सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा प्रकारची अधिसूचना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने नुकतीच जारी केली आहे.

या निर्णयाचे नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने स्वागत केले असून, आता आईल कंपन्यांकडून नव्याने 150 कोटी लिटरइतक्या इथेनॉल खरेदीच्या निविदा निघण्याची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले. ई-20 इंधनमिश्रणावरून निर्माण झालेल्या वादामुळे इंधन कार्यक्षमता कमी झाल्याचा आरोप केंद्र सरकारने यापूर्वीच फेटाळला आहे.

याबाबत साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले की, 150 कोटी लिटर इथेनॉलच्या संभाव्य निविदांमध्ये साखर उद्योगातून उत्पदित इथेनॉलचा वाटा 75 कोटी लिटर राहील. यापूर्वीच्या निविदांमध्ये हे प्रमाण साखर उद्योगातून उत्पादित इथेनॉल 28 टक्के आणि धान्यावर आधारित इथेनॉलचे 72 टक्के वाटा होता. यामुळे देशातील इथेनॉलचा खप वाढण्यासह उद्योगासही फायदा अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचे आम्ही स्वागत करतो. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्‌‍या तेलाच्या किमतीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे बाझीलमध्ये पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या नवीन गाळप हंगामामध्ये उसाचा वापर साखरनिर्मितीपेक्षा इथेनॉलनिर्मितीकडे होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडी लक्षात घेता केंद्र सरकारच्या स्तरावरून इथेनॉल बाबतीतले प्रलंबित निर्णय देखील लवकरात लवकर निकाली काढण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामध्ये इथेनॉल खरेदीदरात वाढ करणे, साखर उद्योगासाठीच्या इथेनॉल कोट्यामध्ये (अलोकेशन) वाढ आणि इथेनॉलचे 150 कोटी लिटरइतके नवीन टेंडर निघण्याचा समावेश आहे.
हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT