पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर पुणेकरांनी सराफा बाजारात सोने-चांदी खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले, यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने-चांदीचे दर आकाशाला भिडले आहेत, मात्र असे असतानाही सोने खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी दरवर्षीप्रमाणेच कायम असल्याचेही दिसत आहे.(Latest Pune News)
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यासह सिंहगड रोड आणि मध्यवस्ती, उपनगर भागातील सोने चांदीच्या दुकानांमध्ये शुभ मुहूर्तावर सोने-चांदीची खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी कुटूंबीयांसह गर्दी केली आहे. अनेकांनी तर घटस्थापनेच्या दिवसापासून सोन्याच्या प्रसिद्ध दुकानांमध्ये सोने खरेदीसाठी अगोदरच बुकिंग करून ठेवले आहे. ते बुकिंग केलेले आज गुरुवारी (दि.02) सोने-चांदी दसऱ्याच्या दिवशी साडेतीन मुहूर्तावर घरी नेण्याची तयारी अनेक पुणेकरांनी करून ठेवली आहे.
सोने-चांदी खरेदी असो अथवा वाहन खरेदी करायची असेल, तर पुणेकर शुभ मुहूर्तावरच खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. तशीच काहीशी प्रथा अनेकांच्या कुटुंबात पिढीजातच आपोआप तयार झाली आहे. या प्रथेप्रमाणे दसरा, दिवाळी पाडवा, गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त, हे सर्व मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे पुणेकर या मुहूर्तावर आवर्जून सोने-चांदीची खरेदी करतात. त्यामुळे बहुतांश पुणेकरांनी यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने-चांदीची खरेदी केली.
यंदा सोने प्रति तोळा (24 कॅरेट) दर 1 लाख 20 हजार 850 रुपये आहे. तर चांदी प्रति किलो दर 1 लाख 52 हजार रुपये आहे. सोने-चांदीच्या भावात यंदा 75 टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे. दर वाढल्यामुळे सोने खरेदीची क्वाँटिटी कमी झाली असली, तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न मात्र कायम आहे. सोने खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी गेल्यावर्षीप्रमाणे कायम आहे. उद्या दसऱ्याच्या दिवशी या गर्दीत आणखी वाढ होईल.फत्तेचंद रांका, अध्यक्ष, पुणे सराफ असोसिएशन/ व्यवस्थापकीय संचालक, रांका ज्वेलर्स प्रा. लि.