दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात तब्बल 9 हजारांहून अधिक वाहनांची खरेदी! Pudhari
पुणे

Dussehra vehicle purchase Pune 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात तब्बल 9 हजारांहून अधिक वाहनांची खरेदी!

दुचाकींची सर्वाधिक मागणी, इलेक्ट्रिक वाहनांनाही चांगला प्रतिसाद; आरटीओच्या नोंदीनुसार खरेदीचा उच्चांक

पुढारी वृत्तसेवा

पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर पुणेकरांनी यंदा तब्बल 9 हजार 531 वाहनांची खरेदी केली आहे. यात सर्वाधिक 5 हजार 438 दुचाकी, तर 2 हजार 554 चारचाकींची खरेदी केल्याची नोंद पुणे आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे. दरम्यान, इलेक्ट्रिक वाहने खरेदीला

देखील यंदा पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला असून, तब्बल 814 इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी पुणेकरांनी यंदा केल्याचे समोर आले आहे.

दसरा सणाच्या मुहूर्तावर पुणेकर वाहन खरेदीला दरवर्षी मोठी पसंती देतात. दसऱ्याचा हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्याची प्रथा आहे. यंदाही पुणेकरांनी दसऱ्यानिमित्त वाहन खरेदी केली. दि. 21 ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत पुणेकरांनी इंधनावरील 8 हजार 717, तर इलेक्ट्रिक 814 वाहनांची खरेदी केली. नेहमीप्रमाणेच दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आणि दसऱ्याच्या दिवशी मनोभावे पूजा करून पुणेकर आपली वाहने घरी नेण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी शोरूममध्ये आपल्या आवडीच्या वाहनांचे बुकिंग करून ठेवले आहे. वाहनाची नोंदणी वेळेत व्हावी आणि पुणेकरांना वाहने वेळेत मिळावीत, याकरिता पुणे आरटीओ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीवर्गाने अथक परिश्रम घेतले जात आहेत.

...तर 814 इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी

यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात 814 ई-वाहनांची खरेदी झाली. यामध्ये 679 दुचाकी, 116 कार, 07 गुड्‌‍स वाहने, 04 रिक्षा, 08 टॅक्सी या वाहनांचा समावेश आहे, अशी नोंद पुणे आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे.

अशी झाली पुण्यात वाहनखरेदी (सन 2025)

वाहन प्रकार : वाहनसंख्या

दुचाकी : 5438

कार : 2554

रिक्षा : 69

गुड्‌‍स : 361

बस : 17

टुरिस्ट टॅक्सी : 191

इतर वाहने : 87

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी इंधनावरील 8 हजार 717, तर इलेक्ट्रिक 814 वाहने खरेदी केली आहेत. याच्या नोंदणीचे काम आमच्या कार्यालयाकडून करण्यात येत आहे. पुणेकरांना दसऱ्याच्या मुहूर्तावरच ही वाहने घरी घेऊन जाता यावीत, याकरिता आमच्याकडून लवकरात लवकर वाहनांची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे.
स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT