पुणे

दापोडी : अस्वच्छतेमुळे पवना विधी घाट परिसर बकाल

अमृता चौगुले

दापोडी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : येथील पवनानदी काठावरील पवना विधी घाटावर गवत, खुरटी झाडे मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहेत. विधी घाटाची नियमित स्वच्छता व देखभाल नसल्याने हा परिसर बकाल बनला आहे. गणेशोत्सव, छटपूजा, श्रावण, अधिक मास व इतर धार्मिक कार्यक्रम, पारंपरिक पूजा विधी करण्यात येतात; परंतु सोयीसुविधांची वानवा असल्याने नागरिकांनी धार्मिक विधीसाठी जायचे कसे? असा प्रश्न केला जात आहे.

दोन फुटांची भिंत ठरतेय अडथळा

पुराच्या पाण्यापासून संरक्षण व्हावे, निर्माल्य कचरा नदीपात्रात जाऊ नये, यासाठी घाटाच्या अलीकडे स्थापत्य विभागाकडून सीमाभिंत बांधण्यात आली आहे. घाटावर ये जा करण्यासाठी पायर्‍याची व्यवस्था नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना घाटावर ये जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. भिंत बांधताना घाटावर जाण्यासाठी पायर्‍या बांधण्याचा स्थापत्य विभागाला विसर पडल्याने नागरिकांना येथे ये जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अनेक महिला या भिंतीवरच पूजा विधी आटपत आहेत. यामुळे भिंतीवरून ये जा करण्यासाठी पायर्‍या कराव्यात, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.

पुरेसा प्रकाश, रस्ता दुरुस्तीची मागणी

विविध सण उत्सव धार्मिक कार्यक्रम, छटपूजा यासारखे कार्यक्रम पवना घाटावर होतात. ही बाब लक्षात घेऊन उत्सव काळात होणारी गर्दी पाहता येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे. नदीकाठ परिसर असल्याने पुरेशा प्रकाशाची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी. सध्या सण उत्सवाला सुरुवात झाल्याने प्रशासनाकडून येथील घाट स्वच्छता, रस्ता डांबरीकरण, उजेडाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

घाट परिसरात गवत वाढले आहे. सण पर्वाचा काळ असल्याने नागरिकांना अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे. याचबरोबर किटक डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. येथे स्वच्छता करण्यात यावी.

– एक नागरिक, दापोडी

पावसाळा सुरू झाल्यापासून या ठिकाणी गवताचे साम—ाज्य वाढले आहे. यामुळे भाविकांना विविध सरपटणार्‍या प्राण्यांपासून जिवाचे संरक्षण करावे लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने त्वरित या ठिकाणची स्वच्छता करावी.

– एक नागरिक, दापोडी

येथील प्रश्नांबाबत वरिष्ठांना कळविले आहे. सीमाभिंतीबाबत माहिती घेऊन येथे कार्यवाही करण्यात येईल. स्वच्छतेबाबत संबंधित विभागाला सांगण्यात येईल. लवकरच प्रश्न मार्गी लावला जाईल.

– शामसुंदर भंडारी, अभियंता स्थापत्य दापोडी विभाग

हेही वाचा

SCROLL FOR NEXT