कसबा पेठ: मुस्लिम समुदायासाठी एक महत्त्वाचा असलेला बकरी ईद हा सण अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त लागणार्या बोकडाच्या खरेदी-विक्रीसाठी भवानी पेठेतील लक्ष्मी बाजारात नागरिकांसह व्यापार्यांची मोठी गर्दी होत आहे.
बाजारात दाखल झालेल्या उस्मानबादी, गावरान, खस्सी बोकडाला नागरिकांकडून विशेष मागणी आहे. राज्यातील धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, खानदेशातील विविध जिल्ह्यांसह लखनऊ (उत्तर प्रदेश), जामनगर (गुजरात), राजस्थान अशा विविध राज्यांमधून ही बोकडे पुण्यातील मार्केटमध्ये येत आहेत. (Latest Pune News)
यंदाच्या वर्षी बोकडांची संख्या वाढली असली तरी प्रतिबोकड किंमत कमीत कमी 20 ते 25 हजारांपासून ते 60 हजार रुपये मोजावे लागत आहेत. साधारणपणे अंदाजे साडेतीन ते चार फुटांपर्यंत उंची असलेल्या बोकडाची किंमत 60 हजारांपर्यंत असल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
खाटीक समाजातर्फे परप्रांतीयांसाठी स्टॉल
भवानी पेठेतील लक्ष्मी बाजारात दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणांहून व्यापारी बोकड विक्रीसाठी येत असतात. या परप्रांतातून आलेल्या व्यापार्यांसाठी पुणे शहर हिंदू खाटीक समाजातर्फे 20-25 स्टॉल बाजारात उभारण्यात आले असल्याचे विश्वस्तांनी सांगितले.
लक्ष्मी बाजाराला विशेष पसंती
बकरी ईदसाठी मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने बोकड खरेदी करतात. मग त्यात वेगळ्या रंगांचे बोकड मिळाले तर हजारो रुपयांची किंमत मोजली जाते. लक्ष्मी बाजारातील वेगवेगळ्या रंगांचे, आकाराचे बोकड एकाच ठिकाणी विक्रीसाठी असल्याने या बाजाराला विशेष पसंती आहे.
1917 पासून सुरू असलेला पुणे शहरातील भवानी पेठेतील लक्ष्मी बाजार आजतागायत सुरू आहे. वर्षभर येथे बोकड बाजार सुरू असतो. नवस फेडण्यासाठी ग्राहक येथून बोकड खरेदी करीत असतात.- अरुण घोलप, अध्यक्ष, पुणे शहर खाटीक समाज