पुणे: रात्रभर सुरू असलेल्या हवाई क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांमुळे संपूर्ण इमारत हादरत होती. काही खिडक्यांच्या तर काचाही फुटल्या. अशात बुर्ज खलिफावर क्षेपणास्त्र कोसळल्याची अफवा पसरली. त्यामुळे आपल्याही इमारतीवर क्षेपणास्त्र कोसळतेय की काय, अशा चिंतेत आम्ही रात्र जागून काढली, असे दुबईतील रहिवासी किरण बेंडे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून दुबईतील एका मोठ्या उद्योग समूहात आयटी व्यवस्थापक म्हणून किरण बेंडे कार्यरत आहेत. ते म्हणाले, की शनिवारची रात्र खूपच भीतीदायक होती. काळ्याकुट्ट अंधारात विमानांचे आवाज येत होते, पण दिसत काहीच नव्हते. जेव्हा एखादे क्षेपणास्त्र रोधक यंत्रणा क्षेपणास्त्र नष्ट करत होती, तेव्हा आकाशात आगीचे लोळ दिसायचे.
जळालेल्या क्षेपणास्त्रांचे अवशेष कोसळल्याने अबुधाबी आणि दुबईतील पाच नागरिक जखमी असल्याची चर्चा आहे. आज रविवार असल्यामुळे सर्व जण घरीच आहेत. त्यामुळे दुबईतील रस्ते रिकामे आहेत. कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगितले जातेय का? याच्या सूचना सोमवारपर्यंत येणे अपेक्षित आहे.
दरम्यान, प्रशासनाने अफवा पसरवू नका, कारणाशिवाय घराबाहेर पडू नका. क्षेपणास्त्रांच्या जळक्या भागांच्या जवळ जाऊ नका, त्याला हात लावू नका, त्याचे फोटो काढू नका, संबंधित प्रशासन हे काम करेल, अशा सूचना दुबई प्रशासनाने दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
शारजाहहून कतार विमानसेवा बंद; मित्राला परत पाठवले
सकाळी माझा एक मित्र शारजाहहून कतारला जाण्यासाठी विमानतळावर गेला. तेव्हा त्याला युएई (युनायटेड अरब अमिराती) मधील सर्वच हवाई मार्ग बंद केल्याची माहिती देत परत घरी पाठवण्यात आले. विमाने रद्द झाल्याने दुबईत आलेल्या पर्यटकांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यांना भारतीय दुतावासातील अधिकारी मदत करत असल्याचे समजते. तसेच, दुबईस्थित भारतीय नागरिकांच्या संघटनेमार्फतही मदत कार्याला सुरुवात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.