Tuberculosis Pudhari
पुणे

Drug Resistant Tuberculosis: औषध-प्रतिरोधक क्षयरोगाचा वाढता धोका; एमडीआर-टीबी आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

औषधे अपूर्ण घेतल्याने वाढते ड्रग रेझिस्टन्स, नव्या उपचारपद्धतींवर तज्ज्ञांचा भर

पुढारी वृत्तसेवा

प्रज्ञा केळकर-सिंग

क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये औषध-प्रतिरोधकतेचे (ड्रग रेझिस्टन्स) प्रमाण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः मल्टिड्रग रेसिस्टंट पल्मनरी टीबी (एमडीआर-पीटीबी) रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यांच्यावर चौथ्या टप्प्यातील उपचारांचा वापर करावा लागत आहे. क्षयरोगाचे निदान झाल्यावर डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमितपणे न घेणे किंवा चुकीच्या पद्धतीने घेणे हे यामागील मुख्य कारण असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार औषध-प्रतिरोधक क्षयरोग रुग्णांसाठी आता इंजेक्शनविरहित, अल्पकालीन आणि प्रभावी उपचारपद्धतींना प्राधान्य देण्यात येत आहे. औषध-प्रतिरोधकता म्हणजे रुग्णांमध्ये आयसोनियाझीड व रिफॅम्पिसीन या दोन प्रमुख औषधांना प्रतिसाद न मिळणे. उपचार सुरू करण्यापूर्वी औषध संवेदनशीलता चाचणी करणे आवश्यक असते. तसेच, प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक उपचार आराखडा तयार करावा, असे संघटनेचे म्हणणे आहे. नियमित कफ तपासणी, दुष्परिणामांवर सातत्याने लक्ष यावर जास्त भर दिला जात आहे.

ससूनमध्ये औषध-प्रतिरोधक टीबीसाठी मसेंटर ऑफ एक्सलन्सफ कार्यरत असून, येथे नियमित तपासणी आणि उपचार केले जातात. सध्या ससूनमध्ये एमडीआर-पीटीबीचे तीन रुग्ण आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. सध्या तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या औषधांवर आधारित शॉर्ट रेजिमेन, बी-पाल एम पद्धतीने उपचार दिले जात आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे 40 टक्के असते. योग्य वेळी निदान, योग्य औषधे आणि संपूर्ण उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात.
डॉ. संजय गायकवाड, फुप्फुसरोगतज्ज्ञ, ससून रुग्णालय
डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे वेळेवर किंवा पूर्ण डोस न घेणे, चुकीच्या किंवा अपूर्ण उपचारपद्धतीचा अवलंब करणे, चुकीची औषधे किंवा कमी गुणवत्तेची औषधे घेणे, अशा कारणांमुळे औषध प्रतिरोधकता निर्माण होते. आरोग्यसेवांमध्ये अडचणी, औषधांची कमतरता किंवा नियमित फॉलोअप न होणे, हीसुध्दा त्यामागील कारणे असू शकतात. रुग्णांना सुरुवातीला दुसऱ्या टप्प्यातील औषधांनी उपचार दिले जातात. उपचाराचा कालावधी 18-24 महिने असतो. रुग्णाची नियमित तपासणी आणि औषधांचे निरीक्षण केले जाते.
डॉ. देवाशिष देसाई, संसर्गरोगतज्ज्ञ, रुबी हॉल क्लिनिक
टीबीवरील औषधांचा उपचार पूर्ण न केल्यास किंवा औषधे अनियमित घेतल्यास जीवाणू औषधांना दाद देत नाहीत. उपचार कालावधी साधारणपणे 18 ते 24 महिने असतो. हे उपचार अधिक दीर्घ आणि काटेकोर असतात. पण, योग्य मार्गदर्शनाखाली प्रभावी ठरतात. योग्य वेळी निदान, योग्य औषधे आणि पूर्ण उपचार घेतल्यास औषध-प्रतिरोधक टीबीही पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, यासाठी रुग्णाने उपचार एकाही दिवसासाठी न चुकवता घेणे, डॉक्टरांच्या सर्व सूचनांचे पालन करणे. नियमित तपासण्या करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
डॉ. महावीर मोदी, फुप्फुसरोगतज्ज्ञ, रुबी हॉल क्लिनिक
औषधोपचारावरील क्षयरुग्णाच्या उपचाराची फलनिष्पत्ती अधिक चांगली येण्यासाठी पोषक आहाराची अत्यंत आवश्यकता असते. क्षयरुग्णांना साहाय्य होण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानअंतर्गत निक्षयमित्र म्हणून सामाजिक संस्था, अशासकीय संस्था, औद्योगिक संस्था, औद्योगिक संघटना, व्यापारी संघटना, व्यवसाय गट, वैद्यकीय संघटना, वित्तसंस्था, युवा मंडळे यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
डॉ. प्रशांत बोठे शहर क्षयरोग अधिकारी, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT